चित्रपटाचं तिकीट 200 पेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश.!

चित्रपटाचं तिकीट 200 पेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश.! 3 May 2017
बंगळुरु : चित्रपटाच्या शोची वेळ, वार आणि थिएटरमधील सीटनुसार वेगवेगळे तिकीट दर प्रेक्षकांकडून आकारले जातात. तिकीटाचे दर हे सर्वसामान्यपणे शंभर रुपयांपासून एक हजाराच्या घरात पाहायला मिळतात. मात्र कर्नाटक सरकारने या प्रकाराला चाप लावत मल्टिप्लेक्समधील तिकीट दर दोनशे रुपयांवर रोखले आहेत. कर्नाटकातील थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील चित्रपटांचे दर हे कर वगळता जास्तीत जास्त दोनशे रुपयांपर्यंत असतील, असं फर्मान कर्नाटक सरकारने काढलं आहे. कन्नड सांस्कृतिक आणि माहिती विभागाचे संयुक्त सचिव एस. एन. जयश्री यांनी काढलेल्या परिपत्रकात हा आदेश आहे. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कानडी चित्रपटांचं तिकीट तीन रुपयांचा सर्व्हिस टॅक्स आणि शून्य मनोरंजन करासह (मनोरंजन करातून सूट दिल्यामुळे) 203 रुपयांपर्यंत असेल. तर कानडेतर (मुख्यत्वे बॉलिवूडपट) चित्रपटांचे तिकीट दर 60 रुपयांचा मनोरंजन कर आणि 4 रुपयांचा सेवाकर धरुन 264 रुपयांपर्यंत असतील. कानडेतर चित्रपटांना गोल्ड क्लास स्क्रीन आणि गोल्ड क्लास सीट्समध्ये सूट देण्यापासून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे कर्नाटकात गोल्ड क्लास स्क्रीनवर कानडी चित्रपट पाहताना 203 रुपयांचं तिकीट लागू होईल, मात्र हिंदी चित्रपट पाहण्यासाठी तिकीट दरावर कोणतंही बंधन नसेल. गोल्ड क्लास स्क्रीनवर कानडी वगळता इतर भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी 500 ते एक हजार रुपयांपर्यंत तिकीट आकारलं जातं. तर कानडी चित्रपटांसाठी 350 ते 500 रुपयांचं तिकीट आहे. आयमॅक्स आणि 4D स्क्रीनवर चित्रपट पाहतानाही 200 रुपयांची मर्यादा नसेल. कर्नाटकमध्ये 40 मल्टिप्लेक्स, तर 600 सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत. त्यापैकी एकट्या बंगळुरुतच 30 मल्टिप्लेक्स आणि 60 थिएटर्सचा समावेश आहे. प्रत्येक थिएटरमध्ये सरासरी 600 सीट्स आहेत. मल्टिप्लेक्समधील स्क्रीन्सचा आकडा दोनपासून दहापर्यंत वेगवेगळा आहे. प्रत्येक स्क्रीनला साधारणतः 200 सीट्स असतात. सर्वसामान्यांना मल्टिप्लेक्समधील सेवांचा लाभ घेत परवडणाऱ्या दरात कन्नड किंवा इतर भाषिक चित्रपट पाहता यावेत, यासाठी दोनशे रुपयांवर तिकीट दर रोखण्यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव होता.