मातंग समाजाच्या कु.भक्ती देवकुळे या विद्यार्थिनीचे अभुतपूर्व यश! दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर कार्यालयात भक्तीचा सत्कार

पंढरपूर (प्रतिनिधी):-
इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेत  कवठेकर प्रशालेच्या कु.भक्ती नारायण देवकुळे या मातंग समाजातील विद्यार्थिनीने संस्कृत विषयात 100 पैकी 99 गुणांसह एकुण 93% गुण पटकावित समाजामध्ये अभुतपूर्व यश मिळविले आहे. भक्ती चे वडील नारायण देवकुळे हे श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये कर्मचारी असून पंढरीतील मातंग समाज बांधवांसह पंढरीतून सर्वत्र भक्तीच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या वतीने पंढरपूर कार्यालयात विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला.

अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असूनही जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्य कायम ठेवून भक्तीने आजपर्यंत च्या विविध शालांत परीक्षेमध्ये आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. भक्तीने मराठी-85, संस्कृत-99, इंग्लिश-82, मॅथमॅटीक्स-94, सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी-94, सोशल सायन्स-93 असा गुणांक मिळविला आहे. आजपर्यंत मातंग समाजातील एकाही विद्यिार्थिनी अथवा विद्यार्थ्याला असे यश मिळाले नव्हते मात्र भक्तीने ती कमतरता दुर केल्याने पंढरीतील मातंग समाजबांधवांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक दामाजी एक्सप्रेस कडून झालेल्या कौतुकामुळे पुढील शिक्षणासाठी नवी उमेद मिळाली असून पुढील काळात आणखी उच्च गुणांकाने यश मिळवीन असा विश्‍वास भक्तीने व्यक्त केला. आपल्या यशामध्ये कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक डबीर सर, शिक्षक बोंदर सर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याने त्यांच्यासह माझे इतर शिक्षक, आई-वडील व आप्तेष्टांच्यामुळेच हे यश मिळवु शकले असेही तिने सांगितले.

 यावेळी भक्तीचे वडील नारायण देवकुळे, वर्षा देवकुळे, सागर जाधव व समाजसेवक कृष्णा वाघमारे आदी उपस्थित होते.