पावसाचा 'लेट मार्क'आणखी महिनाभर काहिली : केरळमधील आगमन ६ दिवस लांबणारमान्सून होतोय सक्रिय
नवी दिल्ली/पुणे : दुष्काळाच्या झळा आणि उष्णतेची तीव्र लाट याने जीव नकोसा झालेले देशवासीय 'येरे येरे पावसा' अशी आळवणी करीत असतानाच हवामान खात्याने निराशाजनक बातमी दिली आहे. नैर्ऋत्य मान्सूनचे केरळमधील आगमन सहा दिवसांनी लांबण्याचा नवा अंदाज हवामान खात्याने जाहीर केल्याने महाराष्ट्राला पावसाची वाट पाहत आणखी किमान महिनाभर होरपळ सहन करावी लागेल.
अंदमान-निकोबार बेटांवर सर्वांत अगोदर मान्सूनचे आगमन होते. हे आगमन यंदा १७ मे रोजी होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले होते; परंतु नव्या अंदाजानुसार त्या ठिकाणी मान्सून उशिरा पोहोचणार आहे. केरळात तो २८ ते ३0 मे रोजी पोहोचणार होता, तो आता ६ किंवा ७ जून रोजी पोहोचणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. सुधारित अंदाजानुसार तो ७ जूनला येणार असून, त्यात ४ दिवस पुढे-मागे होऊ शकते. यामुळे महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांतही त्याचे आगमन लांबणीवर जाऊ शकते. (प्रतिनिधी) मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी अंकगणितासंबंधी मॉडेलच्या आधारावर (स्टॅटिस्टिकल मॉडेल) सहा भाकिते वापरात आणली जातात, त्यातील पाच भाकिते केरळमध्ये मान्सून लांबणार असल्याचे संकेत देणारी आहेत. हंगामातील स्थित्यंतर, मान्सूनपूर्व ते मान्सूनच्या प्रत्यक्ष सरींचा अंदाजही या मॉडेलमध्ये समाविष्ट असतो.
सदर मॉडेलच्या आधारावर आपण केरळमध्ये मान्सून उशिरा येणार असे म्हणू शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे दक्षिण अंदमानला १७ मे तर उत्तर अंदमानला २0 मेच्या दरम्यान पाऊस पडू शकतो. त्याचा एकूणच परिणाम दक्षिण भागात पावसासंबंधी हालचाली वाढण्यात होऊ शकतो, असे पुणे हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. पै यांनी नमूद केले आहे. स्कायमेटचा
अंदाज वेगळा..
२८ ते ३0 मेदरम्यान मान्सून केरळला धडक देणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. या राज्यात मान्सून दाखल होण्याची १ जून ही अधिकृत तारीख मानली जाते. या वर्षी मान्सून सामान्यापेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने याआधीच वर्तवला आहे. स्कायमेटनेही चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. मान्सूनचे भाकीत व वास्तव
वर्ष प्रत्यक्ष आगमन वर्तविलेला अंदाज
२0११ २९ मे ३१ मे
२0१२ ५ जून १ जून
२0१३ १ जून ३ जून
२0१४ ६ जून ५ जून
२0१५ ५ जून ३0 मे सध्याची स्थिती पोषक : भारतीय हवामान विभागाचे एक विशिष्ट मॉडेल आहे. त्यांचे भाकीत नाकारण्याचा प्रश्नच नाही. मात्र माझ्या गेल्या काही दशकांच्या निरीक्षणानुसार पाऊस वेळेत दाखल होईल, असे सध्यातरी वाटते. हवेचा कमी झालेला दाब नैर्ऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक आहे. काही दिवसांपासून वाढलेले तापमान मान्सूनला अनुकूल आहे. दोन वर्षांत मे महिन्यात असे हवामान नव्हते. तापमान वाढल्याने महाराष्ट्रातही हवेचा दाब कमी झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी वार्यांचा प्रवास लवकरच उलगडेल, तेव्हाच स्थिती अधिक स्पष्ट होईल, असे हवामान तज्ज्ञ (कृषी) डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. राज्यात उन्हाची काहिली कायम असून, रविवारीही नागपूरमध्ये तापमान ४५ अंशाच्या वर होते.