देश नेमकं कोर्ट चालवतय की सरकार ? - राज ठाकरे
मुंबई, दि. 16 - 'नीट’ परिक्षेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी आणि पालकदेखील उपस्थित होते.
या बैठकीत राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडत 'नीट’
परिक्षेसंबंधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी
केली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी
प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश केंद्र सरकार
सोयीने बदलत असल्याची टीका केली आहे. तसंच देश सरकार चालवत आहे की कोर्ट ?
असा सवालही विचारला. एकीकडे शेतकरी आत्महत्या सुरु आहेतच.उद्या जर
नैराश्यातून विद्यार्थ्यांनी वेडंवाकडं पाऊल उचललं तर जबाबदार कोण? असंही
राज ठाकरेंनी विचारलं आहे.
मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधानांसोबत बैठकीची वेळ
मिळणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी
मुख्यमंत्र्यांशी दुष्काळाच्या मुद्यावरदेखील चर्चा केली. टँकरने होणारा
पाणीपुरवठा सरकारने हाती घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी
मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज ठाकरेंची मोदींशी चर्चा -
'नीट' प्रश्नावर राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरुन
चर्चा केली आहे. तब्बल 4 ते 5 मिनीट चर्चा करण्यात आली. यावेळी मोदींनी राज
ठाकरेंना लवकरात लवकर तिढा सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे.
विनोद तावडे जे पी नड्डांच्या भेटीला -
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नीट परिक्षेच्या मुद्यावर
केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. जे पी नड्डा यांनी नीट
बाबत सर्वपक्षीय चर्चा करु, राज्यांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडू
असं आश्वासन दिलं आहे. तर विनोद तावडे यांनी नीट परिक्षेसाठी
विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, प्रादेशिक भाषा यावरून अगोदर कोर्टाकडे विनंती
केली जाईल असं सांगितलं आहे. नितेश राणे झोपले होते ते आत्ता जागे झाले
आहेत, राज ठाकरे यांच्याकडे पालक गेल्यानंतर ते प्रयत्न करत आहेत, स्वतःहून
आगोदर लक्ष्य घातले नाही, महाराष्ट्राचे दुर्देव आहे की यावरूनही राजकारण
केले जाते अशी टीका तावडेंनी केली आहे.