सोलापूर जिल्ह्यात पोलिस स्टेशनची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील-विरेश प्रभु ....जेष्ठ नागरिक संघ आणि पंढरपूर लाईव्ह च्या वतीने विरेश प्रभु यांचा सत्कार......पंढरपूर शहरातील उजनी वसाहती नजीक नवे पोलिस ठाणे लवकरंच सुरु होणार.... तन-मनाने पोलिस मित्र बनुन आठवड्यातून किमान दोन तास पोलिसांसोबत रहा... पंढरीतील पोलिस मित्र मेळाव्यात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षकांचे नागरिकरांना आवाहन
पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण विभागातील पोलिसांची संख्या फारच कमी आहे. याचबरोबर सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात पोलिस स्टेशनची संख्या कमी असून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी दिली. पंढरपूर शहराच्या उपनगरातील उजनी वसाहतीनजीक येत्या महिनाभरात नविन पोलिस ठाणे सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पोलिस मित्र मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलिसांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दुर व्हावेत तसेच नागरिक व पोलिस यांच्यात सुसंवाद व्हावा यासाठी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक हे महाराष्ट्रात रुजु झाले तेंव्हापासुन पोलिस मित्र ही संकल्पना राज्यात लागु करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगीकरण व वाढत्या झोपडपट्टी वसाहत यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. त्या अनुषंगाने वाढणार्या गुन्हेगारीस प्रतिबंध व नियंत्रीत ठेवणेसाठी जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. पोलिस व जनता यांच्यातील समन्वय वाढीतून गुन्हेगारांची माहिती तात्काळ मिळविणे, जनतेत जागृती निर्माण करणे, पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे, महत्वाचे सण, उत्सव शांततेत पार पाडणे यासाठी पोलिस मित्रांची आवश्यकता आहे. मी यापूर्वी गडचिरोली, मालेगाव सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी कार्य केलेले आहे. तेथे शिक्षक शाळेत येत नसत, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसत अशा अनेक समस्या पाहिल्या, स्थानिक जनतेशी सुसंवाद ठेवुन त्यांचे प्रश्न समजावुन घेतले व प्रयत्नाअंती त्यांचे निराकरण केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रापेक्षा सर्वात कमी पोलिस संख्या आहे. येथील लिंकरोड वाहतुक प्रश्न आणि मंदिरात मोबाईल नेण्यासंबंधी चे प्रश्न मला कळल्यानंतर ते सोडविले. हे माझे कर्तव्यच आहे. आपल्या समस्या पोलिसांना अवश्य कळवा याचे निराकरण करणे हे आमचे कर्तव्यच आहे. कोल्हापूर परिक्षेत्र चे विशेष पोलिस महानिरीक्षक मा.संजय वर्मा यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात पोलिस मित्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आज येथील पोलिस मित्रांना टीशर्ट, शिट्ट्या व कॅप चे वाटप करण्यात येत आहे. ही बाब समाधानकारक आहे. प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलिसच असतोत्यांनी पोलिस मित्र बनुन आठवड्यातील किमान दोन तास पोलिसांसोबत वाहतुक नियंत्रणासाठी अथवा विविध सण, उत्सवाचे वेळी योगदान द्यावे. आपल्या भागातील कांही अनुचित प्रकार असतील तर ते पोलिसांना कळवावे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पोलिसांसोबत नागरिकांनीही पोलिस मित्र बनुन करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने पोलिस मित्रांसाठी 400 टी शर्ट, 400 शिट्ट्या, 400 कॅप दिले. सोलापूर विधानपरिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पोलिस मित्र ही संकल्पना तशी जुनीच आहे. पूर्वी पोलिसांचे खबरे असत. पोलिस मित्र हे त्याचेच आधुनिकीकरण आहे. पोलिसांना त्यांचे कार्यात समाजातील सजग नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षीत आहे. प्रत्येकाने आपण समाजाचं देणं असतो हे विसरु नये. आपण जसे बोलतो तसे वागावे. प्रत्येेकाला स्वत:चे घर स्वच्छ असावे असे वाटते पण आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आपलं विश्व म्हणजे आपलं घरच नसतं तर आपले गाव, आपला समाज, आपले राष्ट्र चौफेर सुंदर व मजबुत कसे बनेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. आपलं शहर शांत व सुरक्षित असेल तरंच आपण व आपलं कुटूंब सुखी-समाधानी आणि निश्चिंतपणे राहु शकेल याचा विचार करुन आपल्या परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखणेसाठी पोलिसांना सहकार्य करा. पंढरपूर अर्बन बँक ही सभासदांची आहे. चांगल्या कामासाठी अर्बन बँकेचं संचालक मंडळ नेहमीच पुढे असतं. आम्हाला पंढरपूर पोलिसांकडून पोलिस मित्र संकल्पनेसाठी टी शर्ट व इतर सहकार्याबाबत विचारणा झाली. तेंव्हा आम्ही ताकाळ ती मान्य करुन त्यासाठीचा आवश्यक निधी देण्याचे कार्य केले. हे कार्य केले तेंव्हा मी आमदार नव्हतो आणि आमदार होईल याविषयी माहितीही नव्हती असेही ते म्हणाले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, आरपीआय चे जितेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभा पाटील, आण्णासाहेब ऐतवाडकर आदींनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी पंढरपूरमधील सायं. दैनिक निर्भीड आपलं मत च्या वतीने काढण्यात आलेली पोलिस मित्र मार्गदर्शिका प्रसिध्द करण्यात आली. यावेळी संपादक संजय वाईकर उपस्थित होते.
यावेळी पंढरपूरमधील अनेक संस्था व संघटनांचे वतीने विरेश प्रभु यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परिविक्षाधीन आयपीएस जयंत मीना, पोलिस अधिक्षक देशमुख, एपीआय शेख, माने, कदम यांचेसह पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास पंढरपूरमधील पोलिस मित्र, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, स्काउटस् चे विद्यार्थी व पंढरपूरमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक निलेश गोपाळचावडीकर यांनी केले तर आभार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी मानले.जेष्ठ नागरिक संघ आणि पंढरपूर लाईव्ह च्या वतीने विरेश प्रभु यांचा सत्कार
येथील लिंक रोडवर वेगवेगळ्या अपघातामध्ये अनेक मृत्यमुखी पडले. कांही जेष्ठ नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले.येथील भरधाव वेगात होणार्या अवजड वाहतुकीचा प्रश्न बर्याच वर्षापासून रखडलेला होता. याबाबत पंढरपूर लाईव्ह या ई-न्युज वेब पोर्टल व सातत्याने वृत्त प्रसिध्द करुन या मार्गावरील अवजड वाहतुक इतर समस्यांची गंभीरता दर्शविण्यात आली होती. सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी याची तातडीने दखल घेऊन या मार्गावरील अवजड वाहतुक बंद करण्याबरोबरच आवश्यक तेथे गतीरोधक व सुचना फलक बसविण्याचे आदेश दिले. त्यांच्या प्रयत्नातून हा गंभीर प्रश्न सुटला.
या मार्गावरील अवजड वाहतुक बंद झाली. त्याचबरोबर या मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक आणि दिशादर्शक फलक बसविण्यात आले. परिणामस्वरुप या मार्गावरील अपघात थांबले. उपनगरातील जेष्ठ नागरिकांसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या या कार्यानिमीत्त येथील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रा.नागेश सिंघण सर व पंढरपूर लाईव्ह च्या वतीने संपादक भगवान वानखेडे यांचे हस्ते विरेश प्रभु यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांचेसोबत सुभाष लोटके, श्री.ननवरे, आण्णासाहेब ऐतवाडकर, श्री.तोडकर, श्री.कोर्टीकर, श्री.बडके, प्रणव कुलकर्णी, आनंद भोसले, प्रतापसिंंह देवकर, संदीप जगताप व खादी ग्रामोद्योगचे संचालक गणेश सिंघण आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव यांचा सत्कार गणेश सिंघण यांनी केला. तर सोलापूर विधानपरिषदेचे विद्यमान आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार आण्णासाहेब ऐतवाडकर यांनी केला.