भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे

पंढरपूर लाईव्ह

पत्र सूचना कार्यालय
भारत सरकार
पुणे
६ एप्रिल २०१५
विशेष लेख                                            
  शिल्पा पोफळे

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे

  उत्कृष्ट दर्जाच्या विज्ञान शिक्षणाची सुरुवात जेथे आज होते ती Indian Institute of Science Education and Research IISER अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था. पुण्यामध्ये ही संस्था सुरु होऊन आज दहा वर्ष झाली. या काळात संस्थेने बरीच प्रगती केली आहे. विज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक मनुष्यबळ असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असूनही भारत विज्ञान-संशोधनामध्ये, तसेच त्याच्या दर्जामध्ये जगाच्या तुलनेत बराच मागे असल्याची ओरड कायम होताना दिसते. त्यावर उपाय सांगणारी ही संस्था म्हणावी लागेल. आपल्याकडे विज्ञान क्षेत्रातही हुशार विद्यार्थी आहेत, तसेच त्यांना प्रोत्साहित करणारे सक्षम शिक्षकही आहेत, हे दाखवून देणारी ही शैक्षणिक संस्था आहे.

शिक्षण पद्धती:
संशोधनाधारित शिक्षण वा शिक्षण पद्धतीचा अवलंब करणारी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था भविष्यातील वैद्यानिक तयार करण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहे. संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आणखी आवड व आकर्षण निर्माण करताना त्यांना नवीन व योग्य पद्धतीने विचार करण्यास उद्यपित करणे, असे काय व का घडले या पासून दुसऱ्या पद्धतीने का नाही घडले असा दृष्टीकोन तयार करणे, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि हिंमत विद्यार्थ्यांमध्ये आणणे, या गोष्टींवर संस्थेचे संचालक, शिक्षक भर देत आहेत.
पायाभूत सुविधा:
विज्ञानातील विविध क्षेत्रातील संशोधन कला वृद्धिंगत करणाच्या हेतूने संस्थेने उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्याला अध्ययन करणे सोपे-सुकर होते. संस्थेतील ई-वर्गांमुळे विद्यार्थी देशातील इतर IISERशी तसेच आयआयएम, आयआयटी संस्थांशी जोडलेले राहतात. या संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमांचा अभ्यास विद्यार्थी स्थानिक पातळीवर करू शकतात. अध्यापन, अध्ययन आणि संशोधनात सहभागी असलेले अद्ययावत ग्रंथालय संस्थेच्या यशात मोलाची कामगिरी बजावत आहे. संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील कारकीर्द घडवण्यासाठी आवश्यक पाठबळ संस्था देते. संस्थेने सार्वजनिक तसेच खाजगी संस्थांमध्ये रोजगार मिळवून देण्याकरिता किंवा पुढील संशोधन कार्यास मदत करण्यासाठी एका वेगळ्या विभागाची सोय केली आहे.
कार्यक्षम शिक्षक:
या सर्व प्रक्रियेत सक्षम शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची मानली गेली आहे. केवळ संशोधन नाही तर विज्ञान शिकवण्याच्या पद्धतीवर देखील संस्था जोर देत आहे, असे संस्थेचे संचालक, प्राध्यापक डॉ. के. एन. गणेश आवर्जून सांगतात. विज्ञान क्षेत्रात आपल्याला गुंतवणूक करायला हवी, असेही ठाम मत त्यांनी व्यक्त केले. आपापल्या विषयात प्रभुत्व असलेले संस्थेतील शिक्षक कोणताही अध्ययनाचा विषय आधुनिक पद्धतीने शिकवण्यास उत्सुक असतात. प्रत्येक पातळीवर आपल्या ज्ञानाचे उत्तम सादरीकरण करण्यास शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करत असतात. वयाचा, कामाचा, अभ्यासाचा आपला अनुभव शिक्षक नव्याने विज्ञान अध्ययनात, संशोधनात उतरलेल्या नवख्या विद्यार्थ्यांना देताना दिसतात. विज्ञान विषयातील सकारात्मक पैलू विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न हे शिक्षक करतात.
संशोधन कार्य:
संस्थेमध्ये सध्याच्या घडीला अनेक महत्वपूर्ण, नाविन्यपूर्ण विषयांवर संशोधन चालू आहे. सौर उर्जे किंवा इतर कोणत्याही उर्जेचा अधिकतम कुशल वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो, यासाठी उपयोगी पडू शकेल असा घटक पदार्थ शोधून काढण्याचे काम येथे चालू आहे. कार्बन-डाय-ऑक्साईडचे घातक परिणाम दूर करून हायड्रोजनचा वापर करून त्यास उपयुक्त वायू बनविण्याचा प्रयत्न संस्थेतील एक गट करत आहे. हा कार्बन-डाय-ऑक्साईड, हायड्रोजन तसेच इतर वायू साठवून ठेवण्यासाठी हलक्या वजनाच्या टाक्या बनवता येतील असा पदार्थ तयार होऊ शकतो का, यावर संस्थेत संशोधन चालू आहे. जैव युद्धाच्या जागतिक संकटाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर विषारी वायू, सूक्ष्म जीव, स्फोटके अशा गोष्टींचा सुगावा लावू शकणाऱ्या संवेदन तंत्रज्ञानात संस्था हातभार लावत आहे. ‘Health with less wealth’ या शीर्षकांतर्गत कमीत कमी खर्चात औषध निर्मिती कशी करता येईल यावरही संस्थेतील तज्ज्ञ काम करत आहेत. याच्या परिणामस्वरूपी बाजारात औषधे रास्त दारात मिळू शकतील.        
विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास:
विद्यार्थ्याचा सर्वसमावेशक व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी सतत केवळ अभ्यासाच्या वातावरणात राहून चालत नाही. आपल्या इतर आवडी जोपासण्यासाठीचे वातावरण भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये दिसून येते. याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमध्ये वेळोवेळी होत असते. संस्थेमध्ये दुर्लक्षित, वंचित, ग्रामीण तसेच शहरी अशा सर्व भागातून विद्यार्थी प्रवेश घेत असतात. प्रत्येकाची अभ्यास क्षमता उत्तम असते तरीही काही विद्यार्थी केवळ इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने किंवा त्याबद्दल न्यूनगंड बाळगून असल्याने मागे पडू शकतात. हा विचार करून संस्था इंग्रजी भाषेचे, त्यातही विज्ञानातील इंग्रजी भाषेचे वेगळे वर्ग घेते. विज्ञानाच्या अभ्यासासाठी आवश्यक गणित विषयाचे शिक्षण न घेतलेल्या विद्यार्थ्यांचेही वेगळे वर्ग संस्था घेते. वर्षाच्या शेवटी काही तासांमध्ये स्वत:चे ज्ञान सिध्द करण्यापेक्षा वर्षभराच्या नियमित कामगिरीच्या सरासरी गुणांवर विद्यार्थ्याला जोखले जाते. त्यामुळेच अभ्यासात मागे पडणाऱ्या विदयार्थ्याला संस्था सातत्याने पुढे आणण्याचा प्रयत्न करते. ही संधी येथे उपलब्ध आहे.
सामाजिक बांधिलकी:
संस्थेतील विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवण्यासाठी प्रारंभ, दिशा व पृथा अशा उपक्रमांच्या माध्यमातून काम सुरु आहे. पृथाद्वारे पर्यावरणावर काम होत आहे. संस्थेचा परिसर अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी यामाध्यमातून प्रयत्न चालू आहेत. दिशा हा उपक्रम संस्थेतून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमार्फत चालवला जातो. छत्तीसगड मधील दंतेवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. प्रारंभ शैक्षणिक वातावरणापासून दूर असलेल्या वस्तीतील मुलामुलींना शालेय विषयांचे मार्गदर्शन करते. हे काम संस्थेच्या आवारात सुरु आहे. ‘डोर स्टेप’ ही बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी चालवली जाणारी शाळाही या आवारात आहे. या सर्व उपक्रमातून स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासासोबतच आपण आजूबाजूच्या, कदाचित उद्याच्या नव्या वैज्ञानिकांना उभे राहण्यासाठी मदत करू शकतो अथवा ती करायला हवी, ही जाणीव भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागवताना दिसते.   
पुण्यातील या संस्थेकडे आता तिरुपती येथेही सुरु होत असलेल्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली गेली आहे. 

********************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 7 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 81 हजार 123 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 569 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399