श्रीराम रथ यात्रेतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अदभूत दर्शन - श्री. मौलाना वहिदुल्ला अन्सारी चतुर्वेदी

पंढरपूर लाईव्ह

फोटो :- एमआयटी, पुणे व रामेश्‍वर रुई ग्रामस्थांच्यावतीने भारतीय संस्कृतीदर्शन-श्री राम रथयात्रा रामेश्‍वर रुई येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी डावीकडून प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, श्री. जाकीर हुसेन कुरेशी, डॉ. शैलजाकांत मिश्रा, पंडित वसंतराव गाडगीळ, प्रा. वसी शेख, डॉ. एस. एन. पठाण, प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, श्री. मौलाना वहिदुल्ला अन्सारी-चतुर्वेदी, श्री. कमाल पटेल, श्री. तुळशीराम दा. कराड व इतर.

पुणे, दि. 28 : आज राम नवमीच्या शुभमुहूर्तावर लातूर जिल्ह्यातील रुई रामेश्‍वर येथील श्रीराम रथ यात्रेतून हिंदू मुस्लीम  ऐक्याचे अद्भूत दर्शन घडले. ऐक्याचा हाच संदेश जगभर पोहोचविला पाहिजे,’’ असे उद्गार इस्लाम व हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक व तत्त्वज्ञ श्री. मौलाना वहिदुल्ला अन्सारी-चतुर्वेदी यांनी काढले. तसेच मानवसेवा हाच खरा धर्म असल्याचेही त्यांनी नमूद केले.


विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व रामेश्‍वर रुई ग्रामस्थांच्यावतीने भारतीय संस्कृती, परंपरा,तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, तसेच, समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू  श्रीरामचंद्र जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृतीदर्शन-श्री राम रथयात्रा रामेश्‍वर रुई येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

उत्तरप्रदेशचे माजी पोलिस महासंचालक डॉ. शैलजाकांत मिश्रा, पुणे येथील संस्कृतचे गाढे अभ्यासक व तत्त्वज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, पुण्यातील राष्ट्रीय एकता परिषदेचे अध्यक्ष श्री. जाकीर हुसेन कुरेशी हे सन्माननीय प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित होते. या रथयात्रेमध्ये रामेश्‍वरच्या पंचक्रोशीतील हजारो  लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रथयात्रेमध्ये  महिलांचा सहभाग लक्षणीय होता.  यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, 
पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, श्री. कमाल पटेल, श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी श्री. काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री. रमेशअप्पा कराड, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी
संचालक प्रा. राहुल विश्वनाथ कराड, डॉ. सुनील कराड, श्री. राजेश कराड, प्रा. स्वाती चाटे व डॉ. सुचित्रा कराड- नागरे हेही उपस्थित होते.

श्री. मौलाना वहिदुल्लाह अन्सारी-चतुर्वेदी म्हणाले, देशभर आपापल्या धर्माचे कडवे समर्थक भेदभाव निर्माण करीत असताना रुई रामेश्‍वर येथे मात्र प्रेम, बंधूभाव असे दृश्य दिसले आहे. त्यामुळे भेदभावाचे प्रदूषण नाहीसे होईल. हिंदू मुस्लीम धर्मामध्ये एकेश्‍वरवादाचा संदेश दिला आहे. मुस्लीम धर्मसुद्धा निर्गुण निराकार ईश्‍वराची उपासना करतो.

प्रभू रामचंद्र, कृष्ण, गौतम बुद्ध, येसू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर असे अनेक देवदूत ईश्‍वराने वेळोवेळी पाठविले आहेत. त्या सवारबद्दल आदर बाळगून आपण सर्व मानवजात सुखाने नांदू, असे आजच्या घटनेवरुन वाटते. कारण येथून प्रेमाचा, शांतीचा आणि मानवतेचा संदेश दिला जात आहे.’’ श्री. शैलजाकांत मिश्रा म्हणाले, समाजात धर्माप्रती असलेल्या अज्ञानामुळे धर्माधर्मामध्ये भांडणे होत आहेत. सर्व धमारनी एकच सत्य सांगितले आहे.  त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. राम हे आदर्शाचे प्रतिक आहे. अशा या रामनवमीच्या वेळी मुस्लीम बांधव रथयात्रेमध्ये सहभागी झाले, ही मोठी शुभसूचक घटना आहे. हिंदूने खरा हिंदू बनावे, मुस्लीमांनी खरे मुस्लीम बनावे. प्रत्येकजण धर्मनिष्ठ जीवन जगल्यास जगामध्ये बंधुभाव निर्माण होईल.’’

श्री. झाकीर हुसेन कुरेशी म्हणाले, एकतेचा संदेश देणारे प्रा. कराड हे एक देवदूतच आहेत. रामेश्‍वरमधील या हिंदू-मुस्लीम ऐक्याची मला कल्पना नव्हती. पण येथे आल्यावर मला असे एकतेचे वातावरण येथे पहावयास मिळाले. आम्ही पैगंबर
जयंती साजरी करतो. तेव्हा हिंदू बांधव सहभागी होतात. राम नवमीच्या रथयात्रेमध्ये हिंदू-मुस्लीम सहभागी झाले, असे दृश्य भारतभरात कोठेही नाही. आमची राष्ट्रीय एकता संघटना या कार्याला निश्‍चितच साथ देईल.’’

डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, प्रत्येकाचा झेंडा वेगवेगळा असून त्याचा रंग भगवा, निळा, हिरवा, पिवळा जरी असला तरी त्या रंगाचे रूपांतर एका पांढर्‍या रंगात रूपांतर
झाल्यास भारत हा शांतीचा देश म्हणून उदयाला येईल. हिंदू, मुस्लिम, जैन, बौध्द यांसारख्या धमारनी प्रेमाचा संदेश दिला आहे. श्रीरामनवमी उत्सव हा आपल्या भारताचा जयजयकार करणारा आहे. पुत्र कसा असावा, राजा कसा असावा, बंधू कसा असावा, सखा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम होय. रामेश्वर येथे होत असलेली श्रीराम रथयात्रा गावोगावी होणे गरजेचे आहे. श्रीराम रथयात्रा हे भारतीय संस्कृतीचे मूर्तीमंत प्रतिक आहे.’’

प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, आज आमच्या मनात एक कृतार्थतेची भावना आहे. कारण आज ही रथयात्रा संपूर्ण रामेश्‍वर गावाच्या पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी एकत्रित येवून, तसेच, या जन्मसोहळयात व रथयात्रेत सहभागी होवून केवळ लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर सर्व समाजालाच एक नवा मार्ग दाखविला आहे. राममंदिर व मस्जिद यांची एकाच वेळी उभारणी झाली. आता रथयात्रा होवून एक परंपरा चालत आली आहे. ती अशीच अबाधित व अखंडितपणे चालत राहून समाजाला एका वेगळया दिशेने नेईल. राम हा केवळ हिंदू धर्माचा आहे म्हणून आम्ही त्याला मानतो असे नाही तर जगातली अतिप्राचीन अशी जी भारतीय परंपरा आहे, तीचा
तो नायक आहे म्हणून सर्व जगाने त्याचे अनुकरण करावे. मग जगात कोणत्याही प्रकारची अशांती किंवा संघर्ष उरणार नाही. सर्वत्र शांतीचे रामराज्य पसरेल.’’

प्रभू श्री रामजन्म सोहळयाच्या निमित्ताने ह.भ.प. श्री. बालयोगी हरीहर महाराज दिवेगांवकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. श्री. रमेशअप्पा कराड यांनी आभार मानले.

*********

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 एप्रिल  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   79 हजार 137 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 287 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.