कथा दोन जिल्ह्याला जोडणार्‍या परंतु विकासापासुन कोसो दुर असणार्‍या मराठवाड्यातील एका गावाची..! व बातमी न्याय हक्कासाठी केलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाची!

पंढरपूर LIVE 25 जानेवारी 2019

परभणी जिल्ह्यातील तारुगव्हाणच्या ग्रामस्थांचे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन... 
परभणी व बीड या जिल्हाला जोडणारे गाव म्हणजे मौजे तारुगव्हाण. गोदावरी नदीच्या एका तीरावर परभणी जिल्ह्यातील तारुगव्हाण हे गाव आहे तर गोदावरीच्या दुसर्‍या तीरावर बीड जिल्ह्यातील पोहनेर हे गाव आहे. दोन्ही गाव वेगवेगळ्या जिल्ह्यात असले तरी दोन्ही गावचे संबंध खुप जिव्हाळ्याचे. परंतु या दोन्ही गावाचा प्रमुख प्रश्‍न म्हणजे बीड जिल्हा व परभणी जिल्ह्याला जोडणारा खराब झालेला मार्ग. गेल्या अनेक वर्षापासून खराब झालेल्या या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आज पोहनेर, कानसुर या गावातील ग्रामस्थांसह तारुगव्हाणच्या ग्रामस्थांनी गावासमोरच्या या मार्गावर ठिय्या आंदोलन केले आणि कधी नव्हे ते विकासापासून कोसो दुर असणारे तारुगव्हाण हे छोटसं गाव चर्चेत आलं.  

तारुगव्हाण गावाला लागुन जाणार्‍या पाथरी ते पोहनेर हा मार्ग आमराई ते पोहनेर पर्यंत खराब झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासुन या मार्गाच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. आमराई ते पोहनेर च्या मध्यभागी गोदावरी नदीच्या तिरावर तारुगव्हाण हे गाव लागते. तारुगव्हाण या गावात कोणत्याही प्रकारची आरोग्याची सुविधा नाही अथवा प्राथमीक शाळा सोडली तर कोणत्याही प्रकारचे शासकीय कार्यालय नाही ना बँक! साधे पोष्ट कार्यालय सुध्दा या गावाला नाही. या गावाला दैनंदीन महत्वाच्या कामकाजासाठी संपुर्णत: तालुक्याचे गाव पाथरी अथवा गोदावरी नदीच्या पैलतिरावर असणार्‍या पोहनेर या गावाला जावे लागते. त्यामुळे तारुगव्हाणकरांसाठी हा मार्ग दुरुस्त होणे हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

आमराई-तारुगव्हाण-पोहनेर हा पाच ते सात किलो मीटरचा मार्ग 2001 साली अस्तित्वात आला. या रस्त्याने गोदावरी नदीवरील पुल ओलांडून बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता येतो. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. प्रवासासाठी अत्यंत बिकट झालेला हा मार्ग दुरुस्त करुन मिळावा याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना वारंवार कळवून निवेदने देऊनही हा प्रश्‍न रखडलेलाच होता. अखेर संतप्त ग्रामस्थांनी आज हा मार्ग अडवून धरत ठिय्या आंदोलन केले. आम्हाला लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. 

आज सकाळपासूनच सुरु झालेल्या या आंदोलनात पोहनेर, कानसुर येथील ग्रामस्थांनीही सहभाग घेतला होता. यावेळी पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता मुदिराज मॅडम आणि शाखा अभियंता देवडे यांनी आंदोलकांना लेखी आश्‍वासन दिले की, या कामासाठी दोन कोटी पंचावन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असून निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 12 मार्च 2019 पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहोत. लेखी आश्‍वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. परंतु आश्‍वासनाची पुर्तता वेळीच झाली नाही तर आत्मक्लेश व आत्मदहन करु असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी आलेल्या अधिकार्‍यांना सतिश पौळ, रामभाऊ पौळ, विष्णुपंत पौळ, शिवाजी वानखेडे, भगवान पौळ  बाबुराव वानखेडे, रामभाऊ वानखेडे, संजय वानखेडे,  नवनाथ वानखेडे, अंकुश पौळ,  शरद वानखेडे, धनंजय पौळ आदींसह ग्रामस्थांनी निवेदन दिले.

तारुगव्हाण या छोट्याशा गावाबद्दल आणि येथील ग्रामस्थांच्या संयमाबद्दल थोडेसे महत्वाचे...

तारुगव्हाण हे गाव बीड व परभणी जिल्ह्याच्या सीमेला जोडणारे गाव आहे. गोदावरी नदीच्या तीरावर असलेले हे गाव पुराच्या धोक्यामुळे पुनवर्सित झाले आणि गावातील पुरातन माड्या, लादण्या, वाडे सर्वकांही सोडून ग्रामस्थांना पोहनेर -पाथरी मार्गावर आपला संसार थाटावा लागला. जुन्या गावात माड्या, माळवद, लादण्यात व मोठ मोठ्या वाड्यात राहणारे ग्रामस्थ पुनर्वसनानंतर पत्र्याच्या शेडमध्ये व कुडाच्या घरात राहु लागले. पुनवर्षनानंतर या गावात बरेच वर्षे वीज, रस्ते, पिण्याचे पाणी आदी साध्या मुलभुत सुविधाही उपलब्ध नव्हत्या. आत्ता कुठे कांहीजणांनी आपली घरे पक्की बांधली आहेत तर कांहीजणांकडे शौचालय वगैरे सुविधा आहेत. परंतु अनेकजण अद्यापही पत्र्याच्या शेमध्ये अथवा कुडामध्येच राहतात. अशा या दुर्लक्षित गावाच्या सोयी-सुविधांकडे व ग्रामस्थांच्या मुलभुत हक्काकडे ना शासनाचे लक्ष आहे, ना राजकीय नेत्यांचे, ना प्रशासकीय अधिकार्‍यांचे. आजच्या या आंदोलनामुळे निदान या गावचे नांव तालुक्यातील तहसिल कार्यालय व बांधकाम खात्याच्या कार्यालयापर्यंत तरी गेले आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनाही या गावाची वाट माहित झाली. या गावाच्या रस्त्याचा हा प्रश्‍न मार्गी लागेलच परंतु इतर सोयीॅ-सुविधा आणि खिचपत पडलेल्या गोरगरीबांच्या नशिबी सन्मानाचं आणि समृध्दीचं जीणं कधी येणार ? हा प्रश्‍न मात्र अद्यापही अनुत्तरीतच आहे. गरजय निवडणुकीपुरते गावाला पाय लावणार्‍या नेतेमंडळींनी आपली नितीमत्ता जीवंत ठेवुन या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची..... 









महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com