कॉंगे्रसला जदयूचा धक्का रामनाथ कोविंद यांना पाठिंबा


पाटणा, २१ जून
भाजपाप्रणीत रालोआने राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंगे्रसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीत उभी फूट पडली आहे. विरोधी आघाडी उमेदवाराच्या मुद्यावर चाचपडत असतानाच, जदयूने आज बुधवारी कोविंद यांना आपला पाठिंबा जाहीर केला. कॉंगे्रससाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. पाटण्यात आज जदयूच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली.
भाजपा आणि जदयूमधील मैत्री सर्वपरिचित आहे. सलग १३ वर्षे हे दोन्ही पक्ष बिहारच्या सत्तेत होते. तथापि, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिल्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपासोबतचे संबंध तोडले होते. तथापि, काही महिन्यांतच नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि जदयू व भाजपात पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली. त्यातच नितीशकुमार यांनी आज कोविंद यांना पाठिंबा जाहीर करून भाजपासोबतच्या मैत्रीवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. दरम्यान, बिहारच्या सत्तेत राहून मनमानी कारभार करणार्‍या राजदलाही हा धक्का मानला जात असून, यामुळे महाआघाडीतही फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रामनाथ कोविंद यांना शह देण्यासाठी आणि विरोधकांचा संयुक्त उमेदवार जाहीर करण्यासाठी कॉंगे्रसने सर्व समविचारी पक्षांची याच आठवड्यात बैठक बोलावली असताना, नितीशकुमार यांच्या भूमिकेमुळे विरोधी आघाडीतही फूट पडली आहे.
रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल झाल्यानंतर नितीश कुमार आणि कोविंद यांची चांगली मैत्री जमली. आपल्या कार्यकाळात कोविंद यांनी नितीश कुमार यांच्यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण केल्या नाहीत. कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी आणि वादग्रस्त दारूबंदीच्या कायद्यालाही सहमती दर्शवली. तसेच, नितीश कुमार यांनी केलेल्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदांच्या नियुक्त्यांनाही कोविंद यांनी पसंती व्यक्त केली होती. त्यातही विशेष म्हणजे, नितीश कुमार यांचे बिहारमधील राजकारण महादलित संकल्पनेवर आधारित आहे. अशा स्थितीत कोविंद यांना विरोध केल्यास लोकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कुमारांनी कोविंद यांना पाठिंबा दिल्याचे सूत्रांचे मत आहे.
बैठकीलाही पाठ
उद्या गुरुवारी विरोधी आघाडीची बैठक होत असून, या बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णयही जदयूने घेतला आहे. आता आमच्यासाठी ही बैठक अप्रासंगिक ठरली आहे, असे पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111