शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर भव्य स्वागत
नागपूर, दि.17 : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले त्याप्रसंगी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्याऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी हजारो शेतकरी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विमानतळावर स्वागतासाठी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय विमानाने विमानतळावर आगमन झाले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, डॉ. आशिष देखमुख, डॉ. मिलिंद माने, सुधीर पारवे, मल्लिाकार्जुन रेड्डी, विकास कुंभारे, यांचेसह उपमहापौर दिपराज पारडीकर, संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता, अशोक धोटे आदी लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुगदल, अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीचा आनंद व्यक्त करण्यासाठी हजारो शेतकरी विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कर्जमाफी दिल्याबद्दल ढोल, ताशे वाजवून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या इतिहासातील ही सर्वाधिक कर्जमाफी असून 40 लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार असून सातबारा कोरा होणार असल्याचे सांगुन पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांच्या तत्काळ याद्या गोळा करुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज दीड लाखापर्यंत सर्व थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले त्यांच्याकरता सुध्दा योजना तयार करण्यात आली आहे. त्यांनाही 25 हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असून यापूर्वी कधीही ऐवढी मोठी कर्जमाफी करण्यात आली नसल्याचे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने कर्ज माफीचाफार मोठा निर्णय घेतला आहे. या कर्जमाफीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची आहे.यापूर्वी कर्जमाफी देताना झालेला गैरप्रकार यावेळी होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडणार असला तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही निधी उभा करु असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज मिळावे यासाठी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचीअंमलबजावणी तात्काळ करण्यात येत असून यासोबत शेतकऱ्यांना आणखी मदत कशी देता येईल याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अभूतपूर्व कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना देशाच्या हितासाठी सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याबद्दल पृष्पगुच्छ देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. विमानतळावर जमलेल्या हजारो शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111