पंढरपूरमध्ये घर-जागेचे बनावट साठेखत करुन महिलेची फसवणुक

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमध्ये एका 60 वर्षीय महिलेच्या मालकीची जागा बनावट साठेखत करुन ती जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याच्या गुन्ह्याची नोंद शहर पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, पंढरपूर येथील दाळे गल्ली येथे रहाण्यास असलेल्या विशालाक्षी बाबुराव पावले या साठ वर्षीय महिलेच्या व तिच्या पतीचे नांवे असलेली टाकळी, ता.पंढरपूर येथील गट नं. 110/02 ही  01 हेक्टर 75 आर जमीन आरोपींनी संगनमताने या मिळकतीचे बनावट साठेखत करुन सदर महिलेच्या व तिच्या पतीच्या बोगस सह्या करुन ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची फिर्याद स्वत: विशालाक्षी पावले यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

या घटनेतील आरोपी पुढील प्रमाणे आहेत. अंबादास बाबुराव धोत्रे, अजित बाबुराव धोत्रे, शशिकांत दिगंबर अटकळे, किशोर अशोक चौगुले, कुंडलिक तुकाराम मोरे, राजाराम परमेश्‍वर कांबळे सर्व रा. पंढरपूर, महादेव औदुंबर साळुंखे खेडभाळवणी, ता.पंढरपूर, राजेश भारत माळवे, रा.इसबावी, पंजाबराव बाळकृष्ण पवार रा.गोविंदपुरा,पंढरपूर, समाधान उत्तम चव्हाण रा.आढीव, ता.पंढरपूर या आरोपींनी फिर्यादीचे दाळेगल्ली येथील घर नं. 4367 क्षेत्र 133.8 चौ.मी. आपले नांवे करावे म्हणून फिर्यादीस व तिचे पतीस दमदाटी व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे या फिर्यादीत नमुद केले आहे.

वरील आरोपींविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास पीएसआय गोसावी हे करीत आहेत.