शिवसैनिकांनी समिती व्यवस्थापक विलास महाजनांच्या अंगाला फासला पंढरीचा बुक्का! शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना अपमानास्पद वागणुक दिल्याच्या निषेधार्थ...

पंढरपूर (प्रतिनिधी) शिवसेनेचे दुग्धविकास व पशुसंवर्धन राज्यमंत्री  अर्जुन खोतकर हे नुकतेच पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी येऊन गेले. त्यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समिती व्यवस्थापक विलास महाजन यांनी यथोचित सन्मान केला नाही व त्यांना अपमानास्पद वागणुक दिली  याच्या निषेधार्थ शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख संदिप केंदळे व शिवसैनिकांनी व्यवस्थापक विलास महाजन यांच्या अंगावर बुक्का टाकून त्यांच्या तोंडालाही बुक्का फासला आहे.

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा सत्कार मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांच्या हस्ते करण्यात आल्याचा राग शिवसैनिकांना होता. त्यामुळे आज दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजणेच्या सुमारास येथील तुकाराम भवन जवळ असलेले मंदिर समिती व्यवस्थापक विलास महाजन यांना शिवसेनेचे पंढरपूर शहर प्रमुख व इतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. व सोबत आणलेला पंढरीचा बुक्का त्यांच्या अंगावर उधळला. तसेच त्यांच्या तोंडालाही बुक्का फासला गेला.

समिती व्यवस्थापक विलास महाजन यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली फिर्याद

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी आपल्यावर केलेल्या या प्रकाराबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुख संदिप केंदळे व अन्य सातजणांविरुध्द फिर्याद दाखल केली आहे.

रात्री उशीरपर्यंत गुन्हा नोंदविणेचे काम चालु होते.