विठ्ठल साखर कारखान्यावर पुन्हा आमदार भालकेंचाच झेंडा.... विरोधकांच्या अफवावर सभासदांनी विश्‍वास ठेवला नाही-आमदार भारत भालके आम्हाला मिळालेली मते हाच आमच्यासाठी नैतीक विजय -प्रा.डॉ.बी.पी. रोंगे

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि.19 जानेवारी 2016


   श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा आमदार गटात भालके यांचाच झेंडा फडकणार असल्याचे चिन्ह स्पष्ट झाले असून तब्बल दुसर्‍या फेरी अखेर सरासरी 9000 मतांनी आमदार भालके यांच्या श्रीविठ्ठल शेतकरी विकास पॅनलने आघाडी घेतली होती. एकुण 23,994 झालेल्या मतदान संख्येपैकी मतमोजणीच्या दुसर्‍या फेरी अखेर एकुण 18, 414 मतांची मोजणी झालेली असून पैकी आमदार भालके यांच्या कपबशीला एकुण 13,521 मते तर प्रा.डॉ. रोंगे सरांच्या शिट्टीला एकुण 4893 मते मिळालेली आहेत. एकुण 105 मतदान केंद्रांपैकी (बुथपैकी) दुसर्‍या फेरी अखेर एकुण 80 मतदान केंद्रांची मोजणी पुर्ण झालेली असून तिसर्‍या फेरीत एकुण 25 मतदान केंद्रांची (बुथची) मतमोजणी चालु आहे.  या फेरीत एकुण 5,580 मतांची मोजणी बाकी आहे.  

आज येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे, ता.पंढरपूर च्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मतमोजणीच्या तीन फेर्‍यापैकी दोन फेर्‍या पुर्ण झाल्या आहेत.  पहिल्या फेरीअखेर भाळवणी, करकंब गटाची मतमोजणी पुर्ण झाली  तेंव्हा कपबशी ला 6782 मते मिळाली होती तर शिट्टीला 2468 मते मिळाली आहेत. दुसर्‍या फेरीअखेर मेंढापूर व तुंगत गटातून कपबशीला 6739 मते तर शिट्टीला 2425 मते मिळाली आहेत. तिसर्‍या फेरीत सरकोली व कासेगाव गटाची मतमोजणी चालु आहे.

मतमोजणी च्या दुसर्‍या फेरीच्या प्रारंभीच आमदार भारत भालके गटाच्या श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या बाजुने सभासद मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले होते. आमदार भालके यांच्या कपबशीने दुसर्‍या फेरी अखेर एकुण 8628 मतांनी आघाडी घेतली आहे.  प्रा.डॉ. बी.पी. रोंगे यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या पारड्यातही सभासद मतदारांनी दुसर्‍या फेरी अखेर एकुण 4893 मते टाकली आहेत. शेवटच्या फेरीअखेर प्रा.डॉ. रोंगे यांच्या शिट्टीला सहा ते साडे सहा  हजार मते पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सभासदांनी विरोधकांच्या अफवावर विश्‍वास ठेवला नाही-आमदार भारत भालके
यावेळी आमदार भारत भालके यांनी पंढरपूर लाईव्हला आपली  प्रतिक्रिया देताना सांगितले की, विरोधकांनी पसरविलेल्या अफवावर कारखान्याच्या सभासदांनी विश्‍वास ठेवला नाही. सभासदांचा आमच्यावर विश्‍वास आहे. विरोधकांनी ही निवडणुक नाहकपणे सभासदांवर लादली आहे. आमच्या चुका दाखवायच्याच होत्या तर प्रत्येक वर्षी होणार्‍या जनरल मिटींगमध्ये आम्हाला त्या दाखवुन द्यायला हव्या होत्या. कारखान्याचा वार्षिक अहवाल सप्टेंबर महिन्यात प्रसिध्द झाला तेंव्हा त्यामधील त्रुटी बघितल्या नाहीत मात्र डिसेंबर महिन्यात त्या त्रुटी विरोधक वाचुन दाखवितात.यातूनच विरोधक भुलथापा मारत होते हे सिध्द होते. आमच्या अपेक्षेपेक्षा विरोधकांना 1500 मते जास्त मिळालेली आहेत मात्र त्यामध्ये कांही सभासदांचा ऊस कारकान्याकडे येत नाही. बरेच कारखाने झाल्यामुळे इतर कारखान्याकडे काहींचा ऊस जातो. तसेच कांही सभासदांनी स्थानिक उमेदवारावरील आपली नाराजी    व्यक्त करत विरोधकांच्या पारड्यात आपली मते टाकली आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने एक नवा गट तालुक्यात निर्माण होतोय का? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, अगोदरच खुप  गट आहेत. मात्र किती टिकले ते तुम्ही पहातच आहात. आमच्या विरोधकांचा हा नवा गट येत्या पाच वर्षात किती टिकतो याबद्दल शंका आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण विरोधकांच्या शैक्षणिक संस्थेकडे ‘लक्ष’ देणार असून विद्यार्थ्यांकडून फी कशी घेतली जाते, शिक्षणाचा दर्जा वगैरे बाबत माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले.

आम्हाला मिळालेली मते हाच आमच्यासाठी नैतीक विजय -प्रा.डॉ.बी.पी. रोंगे

पंढरपूर लाईव्ह कडे आपली प्रतिक्रिया देताना प्रा.डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, आम्हाला दुसर्‍या फेरीअखेर 4893 मते मिळाली आहेत. तिसर्‍या फेरीत आणखी वाढ होणार आहे. आम्हाला जी ही मते मिळाली  हाच आमचा नैतीक विजय आहे.  विरोधकांना सभासद मतदारांच्या दारादारात जावे लागले, मतदारांची  किंंमत त्यांना कळाली. आम्हाला अपेक्षीत मते मिळाली यात आम्ही संतुष्ट आहोत. प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही प्रथमच निवडणुकीत उतरलो आणि एवढी मते मिळवली अजुन काय हवे? आमचा परिवर्तन गट यापुढेही राजकारणात सक्रीय रहाणार असून सभासदांच्या हितासाठी आमचा लढा चालुच राहील.