कर्ज फेडा, अन्यथा बायकोला पाठवा, जात पंचायतीचा फतवा

नाशिक: आतापर्यंत वाळीत टाकणाऱ्या जातपंचायतींनी त्याही पुढे एक पाऊल टाकल्याचं समोर आलं आहे. कारण, ”कर्ज फेडा, अन्यथा पत्नीला पाठवा”, असा धक्कादायक फतवा गोंधळी जातपंचायतीने काढल्याचा दावा नाशिकमधल्या मोरे कुटुंबियानं केला आहे.परभणीच्या गोंधळी समाजाच्या पंचाकडून हा फतवा काढला आहे.
काय आहे प्रकरण?
मूळ परभणीच्या सेलूतील असणाऱ्या मोरे दाम्पत्यानं पंचाकडून काही कर्ज घेतलं होतं. त्याच्या व्याजापोटी त्यांनी मोठा परतावाही दिला. मात्र मूळ कर्ज फेडण्यासाठी जातपंचायतीनं तगादा लावला. रक्कम परत करता येत नसेल, तर पत्नीला पंचांच्या ताब्यात द्यावी, असा फतवा जातपंचायतीने काढल्याने मोरे कुटुंबीय हादरून गेलं.भेदरलेल्या मोरे कुटुंबीयांनी परभणी सोडून थेट नाशिक गाठलं. दोन वर्षापूर्वी नाशिकमध्ये दाखल झालेलं मोरे दाम्पत्य रोजगार करून गुजराण करतं. मात्र जात पंचायतीने इथेही त्यांची पाठ सोडली नाही.
यानंतर मग मोरे दाम्पत्याने हिम्मत करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. ‘अंनिस’ने हा सर्व प्रकार समोर आणल्याने, जातपंचायतीचा कारनामा जगासमोर उघडा पडला.