जातपंचायतीच्या प्रकरणाला नवे वळण!

परभणी : गोंधळी जातपंचायतीने वाळीत टाकल्याच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. दीपक भोरेंचे जातपंचायतीवरील आरोप निराधार असल्याचा दावा पंच कमिटीने केला आहे.
दीपक भोरे हे सेलू येथे भिसी चालवित होते़ गोरगरीब लोकांचे पैसे घेऊन ते पळाले. तीन वर्षांपासून त्यांच्या सासऱ्याने त्यांना लपवून ठेवले होते़ त्यानंतर आता जातपंचायतीच्या नावाने ते करीत असलेले आरोप निराधार असल्याचे जातपंचायतीचे अध्यक्ष फकीरा भोरे यांचा मुलगा भारत भोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़
कर्जाच्या पैशांसाठी जात पंचायतीने वाळीत टाकल्याचे दीपक भोरे यांनी नाशिकमध्ये सांगितले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीही मदत घेतली. सेलू येथील दीपक व सोनी भोरे हे दाम्पत्य सध्या नाशिकमध्ये आहे. भोरे यांनी पंचांकडून ९० हजार रुपये कर्ज घेतले होते़ तीनपट व्याज भरल्यानंतरही सहा ते सात लाख रुपयांची मागणी पंचांकडून केली जात आहे, तसेच धमकी दिली जात असल्याचे त्यांनी नाशिकमध्ये सांगितले.
जात पंचायतीचे अध्यक्ष फकीरा भोरे यांच्याशी संपर्क साधला असता, फोनवरून त्यांचा मुलगा भारत भोरे यांनी माहिती दिली. भिसीचे ८० ते ९० हजार रुपये घेऊन दीपक पळून गेला आहे़
तीन वर्षांपासून तो गायब होता़ दीपकचे सासरे देवकुमार उघडे, सुभाष उघडे यांनीच त्याला नाशिक येथे लपवून ठेवले होते़ दीपकचा ठावठिकाणा लागल्यानंतर काहींनी त्याच्याकडे गोरगरीब लोकांच्या पैशांची मागणी केली़ त्यातून वाद झाला असेल़ मात्र समाजातील गोरगरीब लोकांचे पैसे परत मिळावेत, एवढ्याच प्रामाणिक उद्देशाने दीपक भोरे याला वाळपत्र दिले़ परंतु समाजातून वाळीत टाकण्याचा आम्हाला अधिकार नाही़
त्यामुळे असे काही केलेले नाही़, असेही भारत भोरे यांनी सांगितले़