कल्याणपासून सीएसटीपर्यंत एक्सप्रेसनेही प्रवास करता येणार!

मुंबई: मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथून तर लाखोंच्या घरात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच लोकलवरील ताण हलका करण्यासाठी आता मध्य रेल्वेनं एक विशेष निर्णय घेतला आहे.

कल्याण आणि ठाणे स्थानकांवरील महिला प्रवाशांना मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून मुबंई सीएसटीपर्यंत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. मात्र, त्यासाठी अतिरिक्त कुपन खरेदी करावी लागणार आहे. तूर्तास हा प्रवास प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.

या प्रवासाठी 30, 20 आणि 10 रुपयांची तीन हजार कूपन्स मध्य रेल्वे विकणार आहे. सीएसटीच्या दिशेनं जाणाऱ्या महालक्ष्मी, देवगिरी आणि लातून या तीन एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे. पहाटे पावणे सहा ते पावणे सात या दरम्यान हा प्रवास करता येणार आहे.

या प्रवासासाठी सर्वात आधी महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि नंतर इतरांना कूपन्स मिळतील.