पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी सह लखुबाईला ओवसा देऊन सुवासिनींनी साजरी केली मकरसंक्रांत... संक्रांतीवर जाणवले दुष्काळाचे सावट....
पंढरपूर लाईव्ह वृत्त : शुक्रवार दि.15 जानेवारी 2016
पंढरपूर सह महाराष्ट्राच्या विविध भागातील सुवासिनींनी आज श्रीविठ्ठल-रुक्मिणी सह दिंडीरववनातील (गोविंदपूरा) लखुबाई ला ओवसा देऊन व एकमेकींना हळदी-कुंकू लावुन तिळगुळ देत मकरसंक्रांतीचा आजचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. पंढरपूर लाईव्ह च्या दर्शकांसाठी हा खास रिपोर्ट.
मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणीला ओवसा देणेसाठी दर वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मोठ्या संख्येने सुवासिनी आजच्या दिवशी पंढरीत येत असतात. दरवर्षी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात ओवसा देणेसाठी दिवसभर महिलांची गर्दी असे. मात्र या वर्षी मंदिर समितीने पहाटेच ओवसा देणे संदर्भात नियम केल्यामुळे ज्या सुवासिनींना पहाटे ओवसा देणे शक्य झाले नाही अशा सुविासिनींनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराऐवजी येथील लखुबाई मंदिरातील रुक्मिणी मातेस ओवसा देत हा सण साजरा केला. आजच्या दिवशी श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली होती दर्शन मंडपाचे सर्व मजले भरलेले होते. दर्शनासाठी किमान 5 तास लागत असल्याचे कांही भाविकांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना सांगितले. आज श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागेचे वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग व लखुबाई मंदिर परिसर सुवासिनींच्या गर्दीने व्यापलेला आढळून येत होता.
ओवसा देणेसाठी खण, तिळगुळ, बोरं, पेरु, गाजर, आदी ओवसायच्या सामानासह लाखेचे गोट (बांगड्या) व हलव्याचे दागिने खरेदी साठी महिलांची गर्दी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेेने मकरसंक्रांती च्या निमित्ताने बाहेरुन आलेल्या भाविकांकडून पंढरपूरमध्ये विविध वस्तुंच्या खरेदी चे प्रमाण कमी आढळून येत आहे. मात्र या वर्षी व्यपार्यांची उलाढाल कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या सणावर दुष्काळाचे सावट असल्याचे मत महाद्वारातील व्यापारी सचिन गायकवाड, व दर्शन मंडप चौकातील नारायण शहा या विक्रेत्यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना स्पष्ट केले.