नागपूर : मुलं व्हावीत म्हणून देवाकडे नवस केल्याचं आपण ऐकलं असेल. पण मुलांना चक्क देवाला दान दिल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. 8 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांच्या मुलीला आजीने देवाला दान केलं.
 
दोन मुलं आधी वडिलांना नकोशी झाली. कारण वडिलांनी घरं सोडलं होतं. नंतर आईनंही दुसरा संसार थाटला. त्यानंतर दोन्ही चिमुकल्यांची जबाबदारी आजीवर आली. पण आर्थिक समस्येमुळे आधी अनाथालयात आणि नंतर चक्क देवाला मुलं दान केली. धक्कादायक बाब म्हणजे मंदिरासोबत करारही करण्यात आला.
आई-वडिलांनी सोडल्यानंतर आजीकडून नातवंडं देवाला दान
 
कुठल्याही मंदिर प्रशासनाला मुलं दान म्हणून घेता येत नाही. मात्र मुलांना दान न घेता आम्ही त्यांचा योग्य सांभाळ केल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. आम्ही त्यांची योग्य काळजी घेत असून त्यांना मुलांना परत घेऊन जायचं असल्यास आमची हरकत नाही, असंही प्रशासनाने म्हटलं आहे.
 
एका दक्ष नागरिकानं हा संपूर्ण प्रकार बाल संरक्षण विभागाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी मुलांना ताब्यात घेतलं.
 
बाल कल्याण समिती न्यायालय जो निर्णय देईल, तेच या मुलांचं पुढचं आश्रयस्थळ असेल. मात्र आधी वडील, नंतर आई आणि आर्थिक समस्येमुळे आजीनंही नकोसं केलेल्या मुलांच्या मनावर रोज काय परिणाम होत असेल, याचा विचार कोण करणार? हा प्रश्न कायम आहे.