भारत-पाक सीमेवरील चाळीस पॉईंट वर ‘लेझर वॉल’ चे सुरक्षा कवच

दि.18 जानेवारी 2016

नवी दिल्ली - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार आता सावध झाले असून, सीमावर्ती भागात ज्या ठिकाणांवरून दहशतवादी घुसखोरी करू शकतात अशा चाळीस स्थळांवर लेझर भिंती (लेझर वॉल) उभारल्या जाणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालय या लेझर वॉलच्या उभारणीबाबत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रामुख्याने पंजाबमधील नद्यांवर या लेझर भिंती उभारल्या जातील. सीमा सुरक्षा दलाने हे लेझर वॉल तंत्रज्ञान विकसित केले असून त्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसेल, असा विश्‍वास गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. 


दरम्यान, ही लेझर वॉल भेदण्याचा प्रयत्न करणारी प्रत्येक सजीव अथवा निर्जीव वस्तू जागेवरच टिपली जाईल, काही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास नियंत्रण कक्षामधील अधिकार्‍यांना तत्काळ तसा संदेश पोचेल. सध्या 40 पैकी 5 ते 6 ठिकाणांवरच या लेझर वॉल उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, पठाणकोटमध्ये घुसखोरी करणारे जैशे महंमद या संघटनेचे सहा दहशतवादी बामियालमधील ऊज्ज नदीतूनच भारताच्या हद्दीमध्ये घुसले होते. त्या वेळेस लेझर वॉल असती तर ही घुसखोरी टाळता आली असती असे संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, या नदीवरील हालचाली टिपण्यासाठी शेजारी एक कॅमेराही बसविण्यात आला होता; पण त्या कॅमेर्‍यामध्ये याचे रेकॉर्डिंगच झाले नसल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.

मोदींच्या भेटीसाठी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी रोजी पठाणकोट हवाईतळास भेट दिली होती, त्या वेळी सीमा सुरक्षा दलाने संभाव्य घुसखोरीच्या स्थळांवर लेझर वॉल उभारल्या होत्या. मागील वर्षी जम्मू सेक्टरमध्ये लेझर वॉल उभारण्याचे काम सीमा सुरक्षा दलाने हाती घेतले आहे. कारण या भागातील अनेक नद्यांमधून घुसखोरी होण्याचा धोका अधिक आहे. पंजाबमधील गुरदासपूरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी घुसखोरी करू शकतात. हा धोका टाळण्यासाठी लेझर वॉलचा पर्याय अवलंबिला जात आहे.