सोलापूरचा चहावाला सीए बनला, सोमनाथच्या जिद्दीची कहाणी!

सोलापूरचा चहावाला सीए बनला, सोमनाथच्या जिद्दीची कहाणी!पुणे : जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत केल्यास काहीही अशक्य नाही, हे सोलापूरच्या सोमनाथने दाखवून दिलं आहे. पुण्यात चहाच्या टपरीवर काम करून सोमनाथ गिरामने अवघड समजल्या जाणाऱ्या सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटट परीक्षेत भरघोस यश मिळवलं आहे.चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर चहावाला सीएची परीक्षा का पास होऊ शकत नाही, हा प्रश्न सतत सोमनाथला सतावत होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरणास्थानी मानून सोमनाथने यश मिळवलं आहे.
 करमाळ्याच्या शेतकरी कुटुंबात जन्म
सोमनाथ बळीराम गिराम हा 28 वर्षीय तरूण सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सांगवी गावचा. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. सोमनाथला एक बहिण आणि एक भाऊ. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. मात्र पावसावर अवलंबून असलेली शेती नेहमीच दगा द्यायची. त्यामुळे गरिबी जीवावर बेतलेली. मात्र या परिस्थितीतही सोमनाथने स्वप्न बाळगलं होतं, सीए व्हायचं.लहानपणापासूनच चाणाक्ष बुद्धीचा सोमनाथ अभ्यासातही हुशार. मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्याला दहावीतच शाळा सोडण्याची वेळ आली होती. पण सोमनाथने शिकण्याची हिम्मत सोडली नाही. शिकण्यासाठी सोमनाथने आई-वडिलांसोबत शेतात मोलमजुरी केली.
 36 किमीचा प्रवास सायकलवरून
सोमनाथ करमाळा तालुक्यातील जेऊर इथल्या भारत हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिकला. मात्र सांगवी ते जेऊर हे 36 किमीचं अंतर तो सायकलवरून करायचा. शिकण्याची धडपड त्याला शांत बसू देत नव्हती. त्याला यशाचा डोंगर खुणावत होता. त्याच जिद्दीने सोमनाथचा प्रवास सुरू होता.
 भावंडाचं शिक्षण थांबलं
घरच्या परिस्थितीमुळे सोमनाथचा मोठा भाऊ आणि बहिणीचं शिक्षण अर्धवट राहिल. मात्र सोमनाथ स्वत: शेतात राबत असल्यामुळे त्याची शिक्षणाची गाडी कशी-बशी ढकलत होती. त्यातच नातेवाईकांच्या डोळ्यातही सोमनाथचं शिक्षण खुपत होतं. शिक्षण सोडून घरच्यांना हातभार लावण्याचा तगादा त्यांनी लावला होता. मात्र सोमनाथने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

पुढील शिक्षणासाठी पुणे गाठलं
सोमनाथने बारावीनंतरच्या शिक्षणासाठी पुणे गाठलं. इथं त्याने जेधे कॉलेज आणि शाहू कॉलेजमध्ये बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. मग GDCA केलं. यादरम्यानच तो कॉलेज सुटल्यावर एका दुकानावर कामाला जात होता. इथं मिळणाऱ्या पगारातून तो आपलं शिक्षण पूर्ण करत होता. पुढे त्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून M.Com ची पदवी मिळवली. पण सोमनाथचं ध्येय वेगळंच होतं.

चहाचं दुकान थाटलं
सोमनाथने सीए परीक्षेची तयारी सुरु केली होती. एका सीए फर्ममध्ये इंटर्नशिप करत होता. पण सीए परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं, क्लास यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग सोमनाथने सदाशिव पेठेतच चहाची टपरी थाटली. या टपरीतच काम करता-करता सोमनाथचा अभ्यास सुरु होता. दिवसभर चहाच्या टपरीवर काम आणि रात्री 5 ते 7 तास अभ्यास असा दिनक्रम सुरु होता.

निकाल लागला, सोमनाथ सीए झाला!
 सोमनाथने सीएची परीक्षा दिली. नुकताच 17 जानेवारीला या परीक्षेचा निकाल हाती आला. सोमनाथला 55 टक्के गुण मिळाले आणि सोमनाथ सीए बनला.

मोदींकडून प्रेरणा मिळाली
 सोमनाथच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र दोन वर्षांपूर्वी सोमनाथने पंतप्रधान मोदींच्या आयुष्याची कहाणी पेपरमध्ये वाचली. मोदींचा संघर्ष ते यश पाहून सोमनाथला प्रेरणा मिळाली. त्यामुळेच सोमनाथनेही मेहनत घेतली.


गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार
 सोमनाथला आता स्वत:ची सीए फर्म सुरु करून एक नामांकित सीए बनायचं आहे. मात्र त्याचवेळी खेड्या-पाड्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करायची आहे. शिक्षणाशिवाय परिस्थिती बदलत नाही, असा ठाम विश्वास सोमनाथला आहे.