बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पित केलेल्या योजना बदलत्या महाराष्ट्राचा संदेश - मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडविते. आज स्व.हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावे लोकार्पित केलेल्या विविध योजना या बदलत्या महाराष्ट्राचा संदेश देणाऱ्या आहेत. भविष्यात एसटीला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे सांगितले.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री.फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, वारिस पठाण, भाई जगताप, परिवहन व बंदरे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सेवा वृत्तीने काम करणाऱ्या एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून दुष्काळग्रस्तांना आपला एक दिवसाचा पगार 6 कोटी 26 लाख 31 हजार 489 रुपये इतका भरीव निधी देऊन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे द्योतक असलेल्या सामाजिक माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

श्री.ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची रक्तवाहिनी असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना आदरांजली ठरतील. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात शिवशाही या नावाने सुरु करण्यात आलेली एसटी बस ही केवळ बस नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुढील चार वर्षांत शिवशाही अवतरणार आहे, असा संदेश देणारी लोकवाहिनी ठरो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

या सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलेल्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे :
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना

एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या आर्थिक भवितव्यासाठी ही योजना सुरु करण्यात येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलीला तिच्या वयाच्या 21 व्या वर्षी विवाहासाठी रुपये 1 लाख दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2016 पासून पुढे जन्मास येणाऱ्या कन्यांच्या नावे एस.टी. महामंडळातर्फे रु. 17 हजार 500 इतकी रक्कम मुदत अथवा दामदुप्पट योजनेत एस.टी बँकेत ठेवण्यात येईल.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना
या योजनेअंतर्गत रा.प. बसेसच्या अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास दहा लाख रुपये, कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला पाच लाख रुपये, अंशत: विकलांग झालेल्या व्यक्तिस रु. दोन लाख पन्नास हजार व तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तिस एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेस लागणारा निधी निर्माण करण्यासाठी रा.प. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सरसकट टिकीटावर एक रुपये नाममात्र अधिभार आकारण्यात येणार आहे. “एक रुपयात दहा लाखाचा विमा” असे योजनेचे स्वरुप असणार आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना
या योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाल्यामुळे अशा कुटुंबास कायमस्वरुपी उपजिवेकेचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिवहन विभागातर्फे मयत शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना विशेष बाब म्हणून ऑटोरिक्षा परवाने देण्यात येणार आहेत तसेच ऑटोरिक्षा करिता 100 टक्के कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा परवाना धारकांकडे परवाना व बॅच असणे आवश्यक आहे. तथापि या योजनेद्वारे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.
शिवशाही बस सेवा
एस.टी.महामंडळातर्फे सामान्य जनतेला “शिवशाही” बस प्रकल्पाद्वारे सुरक्षित आणि सुखकर प्रवास उपलब्ध होणार आहे. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या व्यवहार्य दरामध्ये 500 वातानुकुलीत बसेस सुरु केल्या जाणार असून या बसेस एप्रिल 2016 पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. वाढत्या खाजगी वाहतूकीला शह देण्यासाठी तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या गाड्यांमध्ये अत्यंत आरामदायी आसने, वाचनासाठी दिवे, सी.सी.टी.व्ही., वाय-फाय, जीपीएस, मोबाईल व लॅपटॉप चार्जर्सची सोय असणार आहे त्याचबरोबर आसनाला व शयनयानाला 9 इंची एलईडी स्क्रीन असणार आहे. या बसेस मराठवाडा, विदर्भ, कोकणातील प्रवाशांना व राज्यातील सर्व प्रमुख शहरांशी जोडतील अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिविशेषोपचार रुग्णालय
एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांना उच्च दर्जाची व अतिविशेष सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पुणे येथील मध्यवर्ती ठिकाणी महामंडळाचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, चाचण्या व तपासण्या करण्याची सोय असणार असून बाह्य रुग्ण उपचार, अपघात विभाग, हृदयविकार उपचार विभाग, अतिदक्षता विभाग, रक्त तपासणी, रक्त पेढी, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आदी सुविधा असणार आहेत. या रुग्णालयाची उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर वापरण्यात येणार असून 100 खाटांच्या या रुग्णालयामध्ये एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी 25 टक्के खाटांचे आरक्षण देऊन त्यांना मोफत उपचार देणे बंधनकारक असणार आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण सुमारे अठरा हजार बसेस राज्यभरात विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करत असतात. बसेसच्या दैनंदिन दुरुस्ती व देखभालीसाठी राज्यात 250 आगार कार्यशाळा आणि विशेष दुरुस्ती व बसेस बांधणीसाठी 3 मध्यवर्ती कार्यशाळांची आस्थापना आहे. व्यवस्थापन कोटा राखीव ठेवल्यास या कार्यशाळांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियरची आवश्यकता असून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना स्वयंचलन अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी नवी मुंबई येथील महामंडळाच्या जागेमध्ये ए.आय.सी.टी.ई. च्या निकषानुसार प्रतीवर्षी 60 प्रवेश याप्रमाणे 240 विद्यार्थी क्षमता असलेले स्वयंचलीत अभियांत्रिकी (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) वाहने महाविद्यालय वसतीगृहासह उभारण्याचे प्रस्तावित आहे.
नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाईन लॉटरीत महिलांना 5 टक्के आरक्षित
राज्यात नवीन रिक्षा परवान्यासाठी ऑनलाईन लॉटरीत महिलांना 5 टक्के आरक्षित करण्यात आले असून महिलांकरीता “अबोली रंगाची रिक्षा” सुनिश्चित करण्यात आली आहे. परवान्यांसाठी पुरेशा महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास हे परवाने राखीव ठेवून जसे उमेदवार उपलब्ध होतील तसे त्यांना “First come First serve” या तत्त्वावर जारी करण्यात येणार आहेत.
'महान्यूज'