प्रिय मम्मी पप्पा..म्हणून मी आत्महत्या करतेय..लातुरच्या मोहिनीचं पत्र

लातुर : कितीही दुष्काळ असो…उपवर मुलांचे नातलग आपली वस्तू घेऊन लग्नाच्या बाजारात उभे आहेत. उपवर मुलींचे वडिल या मंडळींच्या मागण्या मान्य करता-करता हतबल होतात. आई-वडिलांची हतबलता बघून लातुरच्या भिसे वाघोलीच्या चुणचुणीत रुपवान मुलीनं काल आत्महत्या केली. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येची त्सुनामी आली आहे. त्यामागे हुंडा हेही एक प्रमुख कारण आहे लातुरमधल्या मोहिनी भिसे या तरूणीचे वडील पाडुंरंग भिसे यांना तीन मुली आहेत. त्यांच्याकडे सव्वा एकर जमीन आहे. मात्र हुंड्यांची चिंता मोहिनीच्या आई- वडिलांना सतावत होती. अखेर मोहिनीने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

latur suicide girlआत्महत्येपूर्वी मुलीचं पत्र 

प्रिय मम्मी पप्पा..
पप्पा दारू पिऊ नका. मी कधीही असा विचार केला नव्हता की मला असे करावे लागेल. कोणतेही स्थळ आले की पहिला प्रश्न हुंडा किती देणार ? मी हे आनंदाने करत आहे. आता तुमचे पैसे लागणार नाहीत. ते मी वाचवले. पपा कोणीही हुंडा का मागतो ? ही प्रथा मोडली पाहिजे. मुलीच्या बापानेच का झुकायचे ? यासाठी मी आत्महत्या करत आहे.  मी गेल्यावर तुम्ही दिवसाचे मासिक आणि वर्षश्राध्द घालू नका. माझ्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी करतात. माझी शांती यातच आहे. तुम्ही मात्र काही करू नका. ममीला सांगा निळूला काम लावू नको. तुम्ही रडू नका. स्वत:ची काळजी घ्या… 
…… तुमची मोहिनी 

आपल्या शेवठच्या चिठ्ठीत असे काळजाला पिळ पाडणारे प्रश्न समाजाला विचारून लातूरच्या भिसे वाघोलीच्या उपवर मोहिनीनं जिवनयात्रा संपवली. मोहिनीच्या जाण्यानं हतबल झालेल्या आईचं दुख पहावत नाही.

चुणचुणीत मोहिनी जात्याचं हुशार. बारावीत ८२ टक्के गुण. मोहिनीचे मम्मी-पप्पा सव्वा एकर जमीनीत राबत होते. त्यात चार वर्षापासून दुष्काळ. दुष्काळानं मोहिनीचं शिक्षण थांबवलं. मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यावर मोहिनीच्या लग्नाची तयारी सुरु होती. पण दरवेळी हुंडा ह्या रुपवान मुलीच्या लग्नाचा अडथळा ठरत होता.

कायद्यानं हुंडा घेण-देण्याला बंदी आहे.पण दुष्काळ असो की नसो उपवर मुलांच्या नातलगांना याची जाण नाही. लग्नाच्या बाजारात मुलांचे दर चढेच आहेत.त्यातून पैशाची तजवीज झाली नाही की मोहिनीसारख्या मुली आत्महत्या करत आहेत. काही दिवस याची खळखळ उडेल.थोड्या दिवसानंतर पुन्हा लग्नाच्या बाजारात उपवर मुलं स्वत:ला आणि त्याचे नातलग आपल्या वस्तूला घेवून विक्रीला उभे राहतील. चांगल्या सावजाच्या शोधात…