सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा दिमाखात

सोलापूर: सिद्धरामेश्वर यात्रेतला सर्वात महत्वाचा विधी आज पार पडला. संमती कट्यावर लाखो भविकांच्या उपस्थितीत सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

सिद्धरामेश्वर मंदिरात मानाच्या सात नंदिध्वजांच्या साक्षीने हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.  कन्नड आणि संस्कृत भाषेतील मंगल अष्टका झाल्यावर लाखो हातांनी अक्षतांचा वर्षाव झाला. लाखो भविकांनी हा अनोखा सोहळा आपल्या डोळ्यात साठवला.

प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा प्रमुख धार्मिक विधी होत असतो. सिद्धरामेश्वरांचा हा प्रतिकात्मक विवाह सोहळा म्हणजे सोलापूरच सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव मानला जातो. एखाद्या विवाहसारखच हा सोहळा पार पडतो.
लाखो भक्तांच्या साक्षीनं सिद्धरामेश्वराचं लग्न पार पडलं. मोठ्या आतुरतेनं ज्या क्षणाची वाट सोलापूरकर पाहात होते, तो क्षण आला. आणि सिद्धरामेश्वराच्या जयघोषानं सोलापूर दुमदुमलं.या यात्रेमध्ये मानाच्या सात नंदिध्वजांना मोठं महत्त्व आहे. नंदिध्वजांनी तैलाभिषेक केला आणि यात्रेचा श्रीगणेशा झाला. ही यात्रा समतेचं प्रतीक आहे. जणू संतांचे सदाचार आचरणात आणण्याचा सोहळा. या बाराबंदीमुळे ही समानता आणखी अधोरेखित होते

सिद्धरामेश्वरांचं हे मंदिरही पुरातन आहे. त्याच्या उभारणीची कहाणीही विलक्षण.

लग्नाबद्दलची आख्यायिका

या सोहळ्याची एक आख्यायिका सांगितली जाते. सिद्धरामेश्वर योगसाधनेत मग्न असताना योगमंदिराच्या बाहेर रोज कोणी तरी रांगोळी आणि सडा मारलेल दृष्टीस पडायचा. एकदा सिद्धरामेश्वरांना एक सुंदर तरुणी हे काम करताना दिसली. त्यांनी मोठ्या कुतूहलाने विचारणा केली. तेव्हा त्या तरुणीने सिद्धरामेश्वरांशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सिद्धरामेश्वरांनी योगी असल्याने विवाह करण्यास नकार दिला. मात्र तिच्या हट्टापायी आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास अनुमती दिली. त्या कुंभार कन्येचा योगदंडाशी झालेला विवाह म्हणजे आजचा सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा.

सिद्धारामेश्वरांनी आपल्या अवतार काळात केलेल्या लोकोद्धाराचं काम केलं. त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष आचरणात आणण्याची कृती म्हणजे ही यात्रा समजली जाते. यात्रेतील सहभाग आणि संतांच्या मार्गावर चालल्याने जीवनाला नवी दिशा मिळते. गंगापूजा, सुगडी पूजा. समती वाचन आणि अक्षता सोहळा असा हा भक्तिमय सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

आज संमती कट्यावर झालेल्या सिद्धरामेश्वरांच्या प्रतीकात्मक विवाह सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली. उद्या होमहवन, परवा शोभेच दारूकाम आणि त्यांनतर नंदिध्वजांच वस्त्र विसर्जन होऊन यात्रेतल्या धार्मिक विधींची सांगता होते. होम मैदानावर मात्र जानेवारी महिना अखेरपर्यंत गड्याची जत्र भरते.

महिनाभर चालणारी ही कदाचित राज्यातली एकमेव यात्रा असावी. जिच्या आयोजनावरून उडालेली वादाची धूळ आता बसली आहे. आसमंतात आता फक्त आहे जयघोष…. सिद्ध रामेश्वरांचा..