पुणे: पेट्रोल पाजून भंगारवाल्याला पेटवलं, 3 अटेकत

पुणे: टू व्हिलरच्या बॅटऱ्या चोरल्याच्या संशयावरून एका अल्पवयीन भंगारवाल्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कसबा पेठेतल्या पवळे चौकातील एका चिंचोळ्या गल्लीत  भर दिवसा ही घटना घडली. याप्रकरणी इब्राहिम शेख, इम्रान तांबोळी (वय २८ ) आणि  जुबेर तांबोळी( वय २६) या तीघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  इम्रान आणि जुबेर सख्खे भाऊ आहेत.

काय आहे प्रकरण?
पुण्याच्या कसबा पेठेत कालपासून दहशतीचं वातावरण आहे. त्याचं कारण आहे निव्वळ बॅटऱ्या चोरल्याच्या संशयावरुन एका अल्पवयीन मुलाला जिवंत जाळल्याचं.

संजय धर्मा राठोड काल दुपारी पवळे चौकातल्या गल्लीत आला. तो भंगार गोळा करत होता. तितक्यात दारु पित बसलेल्या तिघांनी त्याच्यावर गाडीच्या बॅटऱ्या चोरल्याचा आरोप केला. त्याला बेदम मारहाण केली, पेट्रोल पाजलं आणि त्यानंतर उरलेलं पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

ज्या तीन जणांनी हे कृत्य केलं, त्यातल्या एकाला पोलिसांनी कालच अटक केली. तर इतर दोघांना आज गजाआड करण्यात आलं.