मुंबई : जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करुन गेल्या वर्षीप्रमाणेच योजनेच्या कामांमध्ये गती राखून निधीचा पूर्णपणे विनियोग करावा. योजनेच्या माध्यमातून गावे वॉटर न्युट्रल होण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिका-यांनी ठेवावे, यात कुठलीही हयगय करू नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
राज्यातील टंचाई परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षी उपक्रम असून ३१ मार्चपुर्वी पहिल्या टप्प्यातील सर्व गावांतील कामे पूर्ण करावीत. दुस-या टप्प्यातील गावांचे काम देखील विहित कालमर्यादेत पूर्ण करावे. या योजनेसाठी दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग होईल यावर लक्ष केंद्रित करुन जलयुक्त शिवार योजनेमध्ये सहभागी गावे ’वॉटर न्युट्रल’ करण्याचे उद्दिष्ट सर्व जिल्ह्यांनी पूर्ण करावे.
राज्य शासनाने ’मागेल त्याला शेततळे’ ही योजना जाहीर केली आहे. त्यासाठी कुठलीही अट न ठेवता शेतक-यांना शेततळ्याची कामे मंजूर करावीत. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची उपस्थिती कमी आहे. त्यासाठी राज्यात जॉबकार्ड देण्यासाठी विशेष मोहिम सुरु करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.