स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडिलावर आजीवन बंदी
मुंबई : ‘
बीसीसीआय’च्या शिस्तपालन समितीनं क्रिकेटपटू अजित चंडिलावर आजन्म बंदी घातली असून हिकेन शाहवर पाच वर्षांसाठी बंदीची कारवाई केली आहे. 2013 सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडिलासह श्रीशांत आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या तिघा खेळाडूंना अटक झाली होती.
बीसीसीआयने श्रीशांत आणि अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घातली होती. पण अजित चंडिला हा तुरुंगात असल्यामुळे बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीसमोर त्याची सुनावणी होऊ शकली नव्हती.
गेल्या वर्षी 24 डिसेंबरला बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीसमोर अजित चंडिलाची सुनावणी झाली. या समितीनेच चंडिलाला आजन्म बंदीची शिक्षा सुनावली आहे.
अजित चंडिलासोबतच मुंबईचा रणजीपटू हिकेन शाहवरही शिस्तपालन समितीनं कारवाई केली आहे. हिकेन शाहवर मुंबईच्या रणजी संघातल्या आपल्या सहकाऱ्याला मॅच फिक्सिंगची ऑफर दिल्याचा आरोप होता. गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान हे प्रकरण समोर आलं होतं.