पुणे येथील 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास पंढरीच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील निमंत्रीत
पंढरपूर लाईव्ह वृत्त (दि.14 जानेवारी 2016)
दि. 15 जानेवारी 2016 रोजी पुणे येथे होणार्या 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास पंढरपूरच्या कवयित्री सौ. रत्नप्रभा पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. रत्नप्रभा पाटील यांचे आजतागायत अनेक कविता संग्रह प्रसिध्द झालेले असून साहित्याशी निगडीत विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. यापूर्वी गोवा येथे पार पडलेले 54 वे अंकुर साहित्य संमेलन, पुणे येथील दुर्ग साहित्य संमेलन, शब्दघन शिवांजलीचे (शब्दसुमने काव्यमंच) आदी ठिकाणी आपल्या कवितांचे सादरीकरण केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानीत झालेल्या आहेत.
बचत गटाच्या माध्यमातून त्या महिला सक्षमीकरणाचे कार्य करत असतात. तसेच विविध समाजकार्यात त्यांचा सहभाग असतो. गृहिणी, सामाजिक कार्यकर्त्या याचबरोबर लेखिका, कचियत्री अशी चौफेर भुमिका त्या मोठ्या बखुबीने निभावताना आढळतात. त्यांच्या कवितांमध्ये त्यामच्या अंगभुत असणार्या ‘हळव्या व भावनाप्रधान’ स्वभावाचे दर्शन होते. त्यांच्या कांही काव्यातून आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या रुपातील स्त्रीमनाचे व तिच्या अंत:रंगाचे दर्शन होताना आढळते. त्यांचे विविध सामाजिक विषयांवरील लेख ही अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झालेले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्या आपली ‘देव नाही...आमचा विचारच बाटला’ ही कविता सादर करणार आहेत. या निवडीबद्दल त्यांचे पंढरीच्या साहित्यप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.