शिवछाव्याच्या 336 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुळापूरात शंभुराजांना अभिवादन

सोमवार, 18 जानेवारी 2016
 
 कोरेगाव भीमा - तुळापुरात छत्रपती शंभुराजेंचा 336वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शंभुराजांना अभिवादनासाठी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते.


तुळापूर (ता. हवेली) येथे शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक सोहळा ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमानिमित्त सकाळी शंभुराजेंची मूर्ती व ग्रंथांची पालखी मिरवणूक, त्यानंतर फलटण संस्थानचे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या हस्ते सप्तनद्यांचे जल व दह्यादुधाने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे, महात्मा फुलेंच्या वंशज नीता होले, भोसरीचे आमदार महेश लांडगे, जाणता राजा कुस्ती केंद्राचे प्रमुख संदीप भोंडवे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष विकास पासलकर, राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक राहुल पोकळे, नानासाहेब वाणी, शाहीर वैभव खरात, तुळापूरचे सरपंच रूपेश शिवले, उपसरपंच अमोल शिवले आदींसह राज्यभरातून शंभुप्रेमी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणार्‍यांची नावे सभागृहांना देऊन त्यांचे पुतळेही बसविले जात असल्याबद्दल आमदार राणे यांनी या वेळी बोलताना खंत व्यक्त केली; तर शौर्यपीठ तुळापूरचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी निंबाळकर यांनी केली. लांडगे म्हणाले, नेत्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष न बाळगता अशा ऐतिहासिक सोहळ्यांत सहभागी व्हावे. या वेळी शेखर पाटीललिखित शंभुनिती या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पै. चंद्रहार पाटील (डबल महाराष्ट्र केसरी), मराठा जागृती अभियानचे अध्यक्ष संभाजी पाटील (सामाजिक), प्रतिभा उद्योगसमूहाचे अध्यक्ष सतीश चव्हाण (उद्योजक), सांगलीचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, महेंद्र पगडे (मिस्टर ऑलंपिया), आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर हलिमाबी कुरेशी, दशरथ शिंगाडे आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिरात 69 जणांनी रक्तदान केले. संतोष शिवले यांनी प्रास्ताविक केले. धनंजय जाधव, हर्षवर्धन मगदूम, शेखर पाटील आदींनी स्वागत केले. प्रदीप कणसे यांनी सूत्रसंचालन केले.