विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदान सुरु
मुंबई, दि. २७ - विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या एकूण आठ जागा होत्या. मात्र नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेतून भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाल्याने सात जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत खरी चुरस मुंबईतील दोन जागांसाठी आहे.
मनसेने या निवडणुकीत तटस्थ रहाण्याची भूमिका घेतली आहे. अपक्ष उमेदवारामुळे घोडेबाजार मोठया प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतून दोन, कोल्हापूर, धुळे-नंदूरबारमधून प्रत्येकी एक, अहमदनगरमधून एक, वाशिम आणि सोलापूरमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उमेदवार निवडून विधानपरिषदेवर पाठवणार आहेत. नुकसान टाळण्यासाठी शिवसेना-भाजपने युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. अहमदनगरमध्ये विद्यमान आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी) आणि युतीकडून प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) रिंगणात आहेत. धुळेसाठी काँग्रेसचे अमरिशभाई पटेल व भाजपाचे शशिकांत वाणी यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांच्यात थेट लढत होत आहे.
सोलापूरमध्ये आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक साळुंखे व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात चुरस आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघात युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरीया व काँग्रेस-राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांच्यात सरळ लढत होत आहे.