भुजबळ राज ठाकरेंच्या घरी भेटीला

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं झाली, मात्र ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
 
रविवारी सकाळी 7.30 वाजता राज ठाकरेंच्या शिवाजी पार्क परिसरातील कृष्णकुंज या निवासस्थानावर भुजबळ दाखल झाले. त्यानंतर साधारण 9 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास भुजबळ राज ठाकरेंच्या घरुन रवाना झाले.
भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटीमागच्या कारणाबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
 दरम्यान शनिवारी छगन भुजबळ यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदन आणि कालिना भूखंड अशा दोन प्रकरणात भुजबळांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.