फेसबुक, व्हॉट्सअॅपवर बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांवर बंदी आणण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. एफबी, व्हॉट्सअॅपवरुन प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील पोस्टवर कशाप्रकारे अंकुश ठेवता येईल, याबाबत कोर्टाने केंद्राकडे विचारणा केली आहे.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बलात्काराचे व्हिडिओ किंवा सेक्स रॅकेट चालत असल्याची उदाहरणं समोर आल्याने कोर्टाने केंद्र सरकारला या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितलं आहे. दोन्ही घटना घडल्यानंतरही व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल प्लॅटफॉर्मविरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती.
सेक्स व्हिडिओ सेलफोनवरुन शेअर केल्यामुळे कोणत्या यूझरने अपलोड केले आणि कोणी शेअर केले, हे ओळखणं कठीण असल्याचे केंद्राने कोर्टात सांगितलं होतं. फोनऐवजी कॉम्प्युटरवरुन अपलोड झाले असते तर आरोपी सहज शोधता आले असते, असंही मत केंद्राने व्यक्त केलं होतं.
हैदराबादेतील एका एनजीओने फेसबुक, व्हॉट्सअॅपवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका केली होती. व्हॉट्सअॅपवरुन प्रसारित होणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्याचे आदेश केंद्राला देण्याची मागणीही कोर्टाकडे केली.
याचिकेवर सुनावणी करताना साईट ब्लॉक करणं हा उपाय नसल्याचं कोर्टाने सांगितलं. उद्या तुम्ही मोबाईलवर बंदीची मागणी कराल, असं ठणकावत याचिकाकर्त्याने सुचवलेला उपाय निरुपयोगी असल्याचं सांगितलं