ऑस्ट्रेलियाला विजयासह मालिका जिंकण्याची संधी

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुस-या कसोटीला शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. विजयी सलामी देणा-या यजमानांना आणखी एका विजयासह मालिका जिंकण्याची संधी आहे. 

मेलबर्न- ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुस-या कसोटीला शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. विजयी सलामी देणा-या यजमानांना आणखी एका विजयासह मालिका जिंकण्याची संधी आहे.

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवणे, नक्कीच सोपे नाही. स्टीव्हन स्मिथ आणि सहका-यांनी होबार्ट कसोटी तीन दिवसांत डावाने जिंकताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अ‍ॅडॅम वोग्ज आणि शॉन मार्शची दमदार फलंदाजी आणि त्यांना वेगवान गोलंदाज जोश हॅझ्लेवुड आणि जेम्स पॅटिन्सन ऑफब्रेक नॅथन लियॉनची मिळालेली सुरेख साथ यजमानांच्या मोठय़ा विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. कर्णधार स्मिथला पहिल्या कसोटीत मोठी खेळी करण्यात अपयश आले. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीपटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे मेलबर्नवर स्मिथला सूर गवसेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला वाटतो. यजमानांना गोलंदाजीतही चिंतेचे कारण नाही. मात्र हॅझ्लेवुडला पीटर सिडल आणि जेम्स पॅटिन्सनची तशीच समर्थ साथ मिळायला हवी.
ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर मोठा विजय मिळवला तरी प्रतिस्पर्ध्याकडून त्यांना अजिबात चुरस पाहायला मिळाली नाही. यजमानांच्या बहारदार फलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचे तीनतेरा वाजले. डावखुरा फिरकीपटू जोमेल वॅरिकनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तरी त्याला दीडशेहून अधिक धावा मोजाव्या लागल्या. फलंदाजीतही डॅरेन ब्राव्होने पहिल्या डावात तसेच क्रेग ब्राथवेटने दुस-या डावात खेळपट्टीवर थांबण्याची थोडी हिम्मत दाखवली. फलंदाजी उंचावली नाही तर पाहुण्यांचे काही खरे नाही.
‘बॉक्सिंग डे’ कसोटीची उत्सुकता
नाताळ सणादरम्यान खेळल्या जाणा-या कसोटीला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हटले जाते. दरवर्षाप्रमाणे यंदाच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. १९९८पासून खेळल्या जाणारी कसोटी निकाली ठरल्याचाच इतिहास आहे. अपवाद फक्त गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या कसोटीचा आहे. २०००नंतर ऑसट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत केवळ दोनदा पराभूत व्हावे लागले आहे.
वेळ : (शनिवारी) पहाटे ५ वाजल्यापासून.