हिट अँड रन: सलमान सुटला

मुंबई :  हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खान सुटला आहे. हायकोर्टाने त्याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी न्यायाधीश आले आणि त्यांनी अवघ्या 1 मिनिटात निकाल दिला. 1 वाजून 36 मिनिटांनी सलमानची निर्दोष मुक्तता केली.

सलमानवरील दोष सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळेच सलमानला दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
हायकोर्टाच्या या निर्णयानंतर सलमान खानला अश्रू अनावर झाले.
दरम्यान, तपासात कमतरता राहावी यासाठी मुंबई पोलिसांना चिक्कार पैसा मिळाला असावा, असा आरोप आभा सिंह यांनी केला. तसंच या प्रकऱणात अभिनेता कमाल खान याला कोर्टात का हजर केलं नाही, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी असंही सिंह यांनी म्हटलं आहे.

काल उच्च न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणाची निरीक्षणं नोंदवली. कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांची साक्ष विश्वासार्ह नाही, मात्र त्यांच्या साक्षीच्या परिणांबाबत चर्चा होऊ शकते, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं. महत्त्वाचं म्हणजे सलमान दारू पिऊन गाडी चालवत होता, हे सिद्ध करणारे भक्कम पुरावे नाहीत, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांनी सलमानच गाडी चालवत होता, त्यावेळी त्यानं मद्यही प्राशन केलं होतं., अशी साक्ष सत्र न्यायालयापुढे दिली होती. मात्र त्यानंतर त्यांचं निधन झाल्यानं बचावपक्षाला त्यांची उलटतपासणी करता आली नाही.