पंढरीतील नविन कराड नाका येथे अपघात.... उमा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा करुण अंत.... अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक निष्पाप बळी.... उपनगरातील नागरिक संतप्त.... लिंक रोडवरुन होणारी अवजड वाहतुक थांबलीच पाहिजे....

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज

.
बुधवार दि.9 डिसेंबर 2015


              आज सकाळी 7:30 ते 8 वाजणेच्या सुमारास पंढरपूर मधील नविन कराड नाका (प्रबोधनकार ठाकरे चौक) येथे अपघात घडला असून या अपघातामध्ये उमा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा करुण अंत झाला आहे.

              याबाबत पंढरपूर लाईव्ह ला मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी या चौकात विद्यार्थिनी एस.टी. मधून खाली उतरली. व उमा महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना टाकळी रोडच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात अवजड वाहनाने तिला जोराची धडक दिली. या घटनेत सदर विद्यार्थिनी जागीच मयत झाली. डी.व्ही. राजमाने (वय-19), रा. महूद, ता. सांगोला असे या विद्यार्थिनीचे नांव असून ती येथील उमा महाविद्यालयामध्ये बी.कॉम (द्वितीय वर्ष) येथे शिक्षण घेत होती. अपघात स्थळी मुलीच्या महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरुन तिची ओळख पटली असून मुलीच्या पालकांना याबाबत कळविले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी दिली.


               धडक दिल्यानंतर वाहनासह संबंधीत वाहन चालकाने भरधाव वेगात येथून पळ काढला. नागरिकांनी सुध्दा सतर्क राहून अपघात घडल्यानंतर संबंधीत वाहनाचा क्रमांक नोंदवून घेणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने आजच्या घटनेतील वाहनाचा क्रमांक सुध्दा कुणी घेतला नाही. संबंधीत वाहन करकंब च्या दिशेकडे गेल्याचे समजल्यानंतर पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी करकंब पोलिस ठाण्याचे पी.आय. श्री.मानेसाो यांना याबाबत कळविले असून श्री. माने हे स्वत: पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर थांबून करकंब चौकातून जाणार्‍या सर्व वाहनांची कसून चौकशी करत आहेत.


                घटना समजताच येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील, दिपकदादा वाडदेकर, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य मिलींद परिचारक आदी प्रबोधनकार घटनास्थळी दाखल झाले.  घटनास्थळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे व शहर वाहतुक शाखेचे श्री.गोपाळचावडीकर यांनी ही या घटनेची माहिती घेतली असून  पुढील तपास चालु आहे.

               लिंक रोडवरील भरधाव वेगात होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे झालेल्या विविध अपघाताच्या घटनेत या मार्गावर व या चौकात अनेक जणांचा बळी यापूर्वीही गेला आहे. याच चौकात आपली सेवा बजावित असताना पूर्वी एका पोलिस अधिकार्‍याचाही अज्ञात वाहनाच्याधडकेने मृत्यु झालेला होता. आज पुन्हा एका निष्पाप जीवाचा बळी याच चौकात गेला असून उपनगरातील नागरिक या घटनेनंतर संतप्त झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या मार्गावर होणारी अवजड वाहतुक थांबायलाच हवी अशी मागणी नागरिकांची मागणी आहे. पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून आम्ही सातत्याने लिंक रोडवरील वारंवार होणार्‍या अपघाताबाबत व ते टाळण्यासाठीच्या उपाययोजनाबाबत वृत्त प्रसिध्द करत आलो आहोत. आमच्या प्रयत्नाला किंचीत यशही लाभले असून नुकतेच येथे दोन ठिकाणी  गतीरोधक बसविण्यात आले आहेत. गतीरोधक बसविल्यानंतर लिंक रोडवरील अपघातास आळा बसलेला असतानाच आज प्रबोधनकार ठाकरे चौकात ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावरील  अपघात टाळण्यासाठी येथून भरधाव वेगात होणारी अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने शहराच्या बाहेरुन वळविणे हाच यावरचा एकमेव तोडगा आहे. याबाबतही पंढरपूर लाईव्ह ने वेळोवेळी वृत्त दिलेले आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा येथील अवजड वाहतुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला असून या मार्गावरील अवजड वाहतुक रोखण्यासाठी आता पंढरपूरमधील विविध सामाजिक संघटना व जबाबदार नागरिकच आता एकवटायला हवेत.