संजय दत्त 7 मार्चला सुटणार?
मुंबई : मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये असलेला आरोपी अभिनेता संजय दत्त लवकरच कायमचा जेलबाहेर येणार आहे. संजय दत्त येत्या मार्च महिन्यात सुटण्याची शक्यता आहे.

संजय दत्त सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 7 मार्चला तो कायमचा जेलबाहेर येण्याची दाट शक्यता आहे.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयनं आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. त्यानुसार त्याची शिक्षा नोव्हेंबर 2016 मध्ये संपणं अपेक्षित आहे. पण संजूबाबा मार्चमध्येच बाहेर येण्याची तयारी करतोय.
संजय दत्त मे 2013 ते मे 2014 या वर्षभरात तो तब्बल 118 दिवस पॅरोल आणि फर्लोच्या रजेवर तुरुंगाबाहेर राहिला.
प्रथम वैद्यकीय कारणांमुळे ऑक्टोबर 2013 मध्ये 28 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पत्नी आजारी असल्याने त्याला डिसेंबर 2013 मध्ये पुन्हा 28 दिवसांची रजा मिळाली होती. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये त्याला 28 दिवसांची आणखी रजा वाढवून देण्यात आली. त्यानंतर संजय दत्तने चार डिसेंबर रोजी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. अखेर 24 डिसेंबरला त्याला 14 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. संचित रजा पूर्ण होऊनही संजय दत्त परत न आल्याने वादळ उठलं होतं