लिंकरोडवर लवरकरच बसणार गतीरोधक... ‘पंढरपूर लाईव्ह’ ने उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीने दिलेल्या लढ्याला अखेर यश...
पंढरपूर लाईव्ह वृत्त:-गुरुवार दि. 29 ऑक्टोबर 2015
‘पंढरपूर लाईव्ह’ नेटवर्कच्या माध्यमातून पत्रकार भगवान वानखेडे यांनी लिंकरोडलगतच्या सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन येथील लिंक रोडवर वारंवार होणार्या अपघाताबाबत ची वृत्ते सातत्याने पंढरपूर लाईव्ह वर प्रसिध्द केली. याबाबत संबधीत अधिकार्यांशी वेळोवेळी पाठपुरावा केला. याच महिन्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघाता मध्ये लिंकरोडवर दोन जेष्ठ नागरिकांचा मृत्यु झाला. आणि याबाबत दि. 26 ऑक्टोबर 2015 रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता गावडेसाो, पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे पीआय गोपाळचावडीकर यांचेसह पत्रकार भगवान वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंघण, येथील दै.निर्भीड आपलं मत चे संपादक संजय वाईकर यांनी या मार्गाची सखोल पहाणी केली. तेंव्हा या मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक, सुचना फलक आदी बसविण्याचे कामास गती आली असून दि. 28 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनीही या मार्गाची पहाणी केली.
यावेळी त्यांचेसोबत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राऊतसाो, महावितरणचे श्री.घाटोळे, सा.बा.वि. चे श्री.गावडे, पोलिस निरिक्षक श्री.नावंदेसाो, वाहतुक शाखेचे श्री.गोपाळचावडीकरसाो आदी उपस्थित होते. यावेळी लिंकरोडवर आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर, बसवून घेणे, रोडचे मधोमध पट्टे मारणे, रोडवरील वाहतुकीस अडथळा असलेले एमएसईबीचे पोल बाजुला घेणे, याबाबात चर्चा झाली असून लवकरच ही कामे करुन घेणेबाबत ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी सुचना केल्या आहेत. मात्र आजपर्यंत लिंकरोडच्या प्रश्नाबाबत मुग गिळून गप्प राहिलेले कांही राजकीय पुढारी मंडळी मात्र ऐनवेळी आत्ता हे काम होणार असल्यामुळे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी व या कामाचे श्रेय लाटण्यासाठी आत्ता कुठे अधिकार्यांना ‘‘या मार्गावर गतीरोधके बसवा अन्यथा आंदोलने करु!’’ अशा आशयाची निवेदने देताना आढळत आहेत. लिंकरोडच्या या प्रश्नाबाबत गेल्या वर्षभरापासून पंढरपूर लाईव्ह वर सातत्याने बातम्या लावून या मार्गावरच्या भीषण वास्तवाची जाणीव अधिकार्यांना करुन दिली. तेंव्हा कुठे हा प्रश्न मार्गी लागत आहे. आजतागायत या प्रश्नाबाबत कोणत्याही राजकीय पुढार्याने चक्कार शब्द काढलेला नसताना आत्ता अचानकच कांही राजकीय नेत्यांना जनकल्याणाची उपरती कशी आली? हा प्रश्न पंढरपूरच्या उपनगरातील सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
पंढरपूरमधील प्रबोधनकार ठाकरे चौक (जुना कराड नाका चौक) ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी.पी. चौक) या दोन चौकांना जोडणार्या लिंक रोडवर (व्ही.व्ही.आय.पी. मार्ग) आजतागायत घडलेल्या विविध अपघातात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या मार्गावरुन होणारी भरधाव वेगातील अवजड वाहनांची वाहतुक, मार्गावर दोन ठिकाणी असणारी धोकादायक वळणे, अरुंद रस्ता व रस्त्यावर कोठेही नसणारे गतीरोधक या सर्व बाबीमुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हा मार्ग व्ही.व्ही.आय.पी. कक्षेत मोडत असल्यामुळे या मार्गावर गतीरोधक बसवता येत नाहीत असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकार्यांचे म्हणणे होते. मात्र याच महिन्यात घडलेल्या दोन जेष्ठ नागरिकाच्या अपघाती निधनानंतर या प्रश्नाबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी वरीष्ठांकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावला आहे. दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पंढरपूरधील लिंकरोडनजीक असणार्या सिंघण हॉल मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत डोंबाळी, पत्रकार भगवान वानखेडे व सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंघण यांनी श्री.नावंदे यांचे उपस्थितीत उपनगरातील नागरिकांचा पोलिसांशी सुसंवाद साधणेसाठी एका कार्यक्रमाचे आयोजने केले होते. यावेळी ‘पोलिस मित्र’ या संकल्पनेसह नागरिकांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा झाली. याचवेळी लिंकरोडवर गतीरोधक बसविणार असल्याची माहिती श्री.नावंदेसाो यांनी दिली होती. यानंतर भगवान वानखेडे व गणेश सिंघण यांनी उपनगरातील कांही सर्वसामान्य नागरिकांच्या सह्यांचे एक निवेदन दि. 26 ऑक्टोबर रोजी लिंकरोडची पहाणी झाल्यानंतर तात्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांना दिले होते. यानंतर पोलिस अधिक्षकांच्या सह वरील सर्व अधिकार्यांनी या मार्गाची पहाणी करत लिंकरोडवरील स्पीड ब्रेकर, पांढरे पट्टे, आवश्यक तेथे सुचना फलक आदी कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने निर्णय झाले. वरील सर्व अधिकार्यांचे व विशेषत: पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तत्परतेमुळेच हा प्रश्न मार्गी लागु शकला. याबाबत उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. पंढरपूर लाईव्ह ने सर्वसामान्य उपनगरातील रहिवाशांसोबत दिलेल्या लढ्याला मिळालेल्या या यशात सर्वसामान्यांचाच मोलाचा वाटा आहे. ऐनवेळी समाजसेवेचा पुळका कोणी आणु नये एवढेच.
______________






