डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना राजकीय पाठिंबा - नारायण राणे मोदी हे लबाड घरचं आमंत्रण - नारायण राणे ‘महाराष्ट्र भूषण’ चा वाद दुष्काळावरील लक्ष विचलीत करण्यासाठी ! नारायण राणे यांची राज्य सरकारवर घणाघाती टीका

मुंबई, दि. 20 - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांचा शोध न लागल्याबद्दल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. फडणवीसांची निष्क्रीयता पाहता ते मारेक-यांचा शोध लावू शकणार नाहीत, तसेच या मारेक-यांना राजकीय पाठिंबा दिला जात आहे. असा गौप्यस्फोट राणे यांनी  केला .मोदी सरकारवरही त्यांनी कडाडून टीका केली. बिहारची विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याने मोदींनी बिहारला सव्वा लाख कोटी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली. मोदींची ही घोषणा फसवी असून, यापूर्वी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाने आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदींच्या घोषणा किती विश्वासार्ह असतात, याचा पुरेपूर अनुभव घेतल्याचे नारायण राणे म्हणाले. तसेच मोदी हे लबाड घरचं आमंत्रण. असा टोला मारला.

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकारने हेतुपुरस्सर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद चिघळवला, अशी टीका वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.  

येथील गांधी भवनस्थित प्रदेश काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, यंदा शेतक-यांना पुरेशी मदत मिळालेली नाही, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. या परिस्थितीचा सामना करण्यात भाजप-सेनेचे सरकार अपयशी ठरल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे. त्यामुळेच शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद जाणीवपूर्वक पेटता ठेवून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला.

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक लिखाण केल्याचा आक्षेप अनेक साहित्यिक, इतिहासकार व विविध क्षेत्रातील नामवंतांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्काराबाबत असा वाद निर्माण होताच महाराष्ट्र सरकारने संबंधितांशी चर्चा करून तो शमवायला हवा होता. उलटपक्षी सरकारने ताठर भूमिका घेऊन वादात तेल ओतले. या वादाला हेतुपुरस्सर जातीय रंग देण्यात आला. हे सरकार जातीयवादी आहे, असा आरोप राणे यांनी केला.

शिवाजी महाराजांबाबत अवमानास्पद लिखाण केल्यामुळे जेम्स लेनच्या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाची बंदी आहे. या पुस्तकावर वितरक म्हणून पुरंदरे प्रकाशनाचे नाव असून, ही संस्था बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. या पुस्तकाचे पुरंदरेंनी जाहीरपणे कौतूकही केले आहे. महाराष्ट्र सरकारची बंदी असलेल्या पुस्तकाचे वितरण आणि जाहीर कौतूक करणा-या व्यक्तीला महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार कसा दिला जाऊ शकतो, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. पुस्तक लिहिण्यासाठी जेम्स लेनला माहिती देणा-या पुरंदरेंचा बोलविता धनी कोण, अशीही विचारणा त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक विधानांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. बाबासाहेब पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांमुळे पुरंदरे, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. मी कोणाला भीत नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. ते कोणाला घाबरत नसतील तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा राजभवनातील बंदिस्त सभागृहात का घेतला, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. फडणवीसांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होतो. फडणवीसांना कोणाची भीती नसती तर त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा देखील वानखेडेवरच घेतला असता, असा टोलाही राणेंनी लगावला.
पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.