आषाढी यात्रेची सांगता.... गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥

पंढरपूर दि. 31 : गोपाळपूर (पंढरपूर)

 येथे गोपाळकाल्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे चार वाजल्यापासून पालख्या व दिंड्यांनी गोपाळकाल्यासाठी रीघ लावली होती. गोपाळकाल्याच्या उत्साहाने आषाढी यात्रेची आज सांगता  झाली.
     गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या जयघोषाने गोपाळपूरनगरी दुमदुमून गेली होती. येथील श्रीकृष्णाच्या गोपाळकाल्याला भागवत धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमा असल्याने प्रत्येक भाविक गोपाळपूरला येऊन आपली यात्रा मनोभावाने पूर्ण करीत होते.
               गोपाळपूर येथील गुरव समाज बांधवांच्या वतीने पहाटे चार वाजता श्रीकृष्णाची महापूजा करण्यात आली. यावेळी अंमळनेरकर महाराजासह संत गोरोबा, संत जनाबाई, संत सोपानकाका, संत नामदेव महाराज, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, संत नरहरी सोनार यांच्या  पालख्यासह, दिंड्या गोपाळकाल्यासाठी गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने पालखी विसावल्यानंतर  पूजा करण्यात आली.
    नंतर विठ्ठल मंदिरात पालख्या  येऊन विठ्ठलाचे दर्शन  घेऊन सर्व मानाच्या पालख्या आपापल्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या.तत्पूर्वी मंदीर समितीच्यावतीने मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी पादुकांचे पुजन व  मान्याच्या पालख्यांचे मानकरी यांचे उपरणे,श्रीफळ व हार देवून सत्कार केला. यावेळी व्यवस्थापक विलास महाजन  यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
                  00000