मंदिर समितीने ऑडीट जाहीर करावे पंढरपूर भाजपाची मागणी

पंढरपूर LIVE 15 नोव्हेंबर 2018




पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती इंटरनल व गव्हर्नमेंट ऑडिट करत असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील तमाम सामान्य भाविकांच्या माहितीसाठी हे ऑडिट जाहीर करावे, असे आव्हान पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सर्व मंत्रीमंडळ राज्यामध्ये पारदर्शक कारभार करत असून देशाचे पंतप्रधानही पारदर्शक कारभाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी तर आपल्या मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्र्यांना दरवर्षीचा स्वत:चा रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ते स्वत:ही आपल्या कारभाराचा रिपोर्ट मंत्रीमंडळासमोर सादर करतात. तीच परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये चालू ठेवली आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनाही मंदिर समितीचा कारभार व्यवस्थितपणे चालविता यावा, यासाठी राज्यमंत्री समकक्ष पदाचा दर्जा मुख्यमंत्र्यांनी खास कायदा करून दिला आहे. त्यामुळे मंदिर समितीचा कारभार पारदर्शकपणे चालू आहे, याची खात्री राज्यातून व राज्याबाहेरून येणार्‍या लाखो सामान्य भाविकांना व्हावी, याकरीता आषाढी यात्रा व कार्तिकी यात्रेच्या दरम्यान त्यांनी मंदिर समितीच्या कारभाराचे ऑडिट सामान्य भाविकांसाठी जाहीर करावे, अशी मागणी भाजपा अध्यक्ष संजय वाईकर यांनी केली आहे.
मंदिर समितीकडे प्रतीवर्षी किती देणग्या गोळा होतात, किती सोने-चांदी जमा होते. त्याचप्रमाणे देवाला येणारी वस्त्रे, पोषाख, रूक्मिणी मातेकडे येणार्‍या साड्या, त्याची वर्गवारी याची सविस्तर माहिती भाविकांसाठी सादर केली जावी, दक्षिणेच्या रूपाने मंदिर समितीला मिळणार्‍या कोट्यावधी रूपयांच्या देणग्या या कशा पद्धतीने खर्च केल्या जातात, याचाही तपशील भाविकांसाठी सादर करणे गरजेचे आहे. मंदिर समितीला मिळणार्‍या उत्पन्नातून समिती लोकहितासाठी किती पैसा खर्च करते, त्यातून आत्तापर्यंत कोणकोणते सामाजिक उपक्रम उभे केले गेले, त्याचा तमाम भाविकांना किती फायदा झाला, मंदिर समितीने उभा केलेल्या आवाढव्य भक्त निवासासाठी खर्च केलेली रक्कम कोणत्या स्वरूपाच्या देणगीतून केली आहे, त्यातून नेमकी किती रक्कम खर्च करून ही इमारत उभी राहिली आहे, या इमारतीचा उपयोग भावी काळात सामान्य भाविकांना होणार का व्हीआयपी भाविकांसाठी होणार? याची माहिती भाविकांना मिळावी. मंदिर समितीमध्ये किती कायमस्वरूपी कामगार आहेत, किती हंगामी कामगार आहेत, त्यासाठी होणारा खर्च किती आहे, याचीही सविस्तर माहिती मंदिर समितीने जाहीर करावी, याशिवाय दरमहिन्याच्या प्रत्येक बैठकीसाठी किती खर्च होतो व त्यातून मंदिर समितीला काय फायदा होतो, याचाही तपशील जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

1985 साली मंदिर समितीची स्थापना झाल्यानंतर ही समिती अस्थायी स्वरूपाची आहे, त्यामुळे मंदिर समितीच्या प्रचलित कामकाजामध्ये कोठेही हस्तक्षेप न करता बडवे-उत्पातांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून या समितीची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामुळे मूळ कामकाजामध्ये बदल न करता केवळ चौकीदाराची भूमिका ही समिती करत होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात याचे ऑडिट जाहीर केले जात नव्हते.

1985 सालापासून आजपर्यंत कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये अथवा मंदिर समितीच्या प्रवेशद्वारासमोर अशा प्रकारचे ऑडिट भाविकांसाठी खुले करण्यात आले असल्याची घटना कोणत्याही भाविकाला कधी पहावयास मिळाली नाही.
आता ही मंदिर समिती स्थायी स्वरूपाची झाली आहे. परंपरेने काम करणारे बडवे-उत्पात व सेवाधारीही मंदिरातून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे सर्व कारभार हा मंदिर समितीकडेच आलेला आहे. आता मंदिरामध्ये जे काही घडेल, त्याची पूर्ण जबाबदारी ही मंदिर समितीचीच असणार आहे. त्यामुळे या मंदिर समितीने पारदर्शक कारभार जनतेसमोर आणण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण तसेच सरकारी लेखापरिक्षण करून त्याची इत्यंभूत माहिती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावी किंवा श्रीसंत नामदेव पायरीसमोर मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ती डिजीटल स्वरूपात लोकांना वाचता येईल, अशा प्रकारे सादर करावी किंवा मंदिर समितीने आल्या वेबसाईटवर ही सर्व माहिती तमाम भाविकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावी, अशी मागणी पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी केली आहे.

पंढरपूरचा विठोबा हे गोरगरीबांचे दैवत आहे. अशी भावना राज्यातील तमाम भाविकांची आहे. परंतु मंदिर समितीचा आदर्श मात्र तिरूमल तिरूपती बालाजी मंदिर तसेच शिर्डीचे साईबाबा मंदिर असल्याने त्या धर्तीवर पंढरपूरच्या मंदिर समितीची रचना करण्यासाठी सर्व समिती अहोरात्र कष्ट घेत आहे. त्याचा हेतू हा भाविकभक्तांसमोर देखावा निर्माण करून जास्तीत जास्त देणग्या मंदिर समितीला कशा मिळतील, असा असल्याने त्यांच्या समोरही भव्यदिव्य काम करण्याचेच उद्दीष्ठ दिसून येते.
पंढरपूर शहरातील किंवा मंदिर परिसरातील कोणत्याही समस्येशी या समितीला काहीही देणे-घेणे नाही. केवळ मोठमोठ्या इमारती बांधणे, देणगीदारांची रक्कम त्याठिकाणी खर्च करणे व त्यातून पुन्हा कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न मंदिर समितीला मिळवून देणे, अशा प्रकारचे काम करण्याकडे या समितीचा कल दिसून येतो.

आधुनिक युगामध्ये याची गरज मानली तरीही गोरगरीबांचा देव ही संकल्पना पुसून जाणार नाही, याची काळजी घेऊनच समितीने कारभार करणे गरजेचे आहे. तसा कारभार होतो का नाही, हेही लोकांना समजणे आवश्यक आहे. शिर्डीचे साईबाबा मंदिर, शेगावचे गजानन बाबांचे मंदिर या मंदिरांचा आदर्श घेण्याचे या समितीने ठरविले असले तरीही या दोन्हीही मंदिरातून मिळणार्‍या देणगीचा उपयोग किती सेवा प्रकल्प राबविण्यासाठी केला आहे, याची माहिती घेऊन तोही आदर्श पंढरपूर मंदिर समितीने घ्यावा, अशी मागणी होत आहे.

केवळ उत्पन्न वाढविणे व त्यातून गुंतवणूक करून पुन्हा उत्पन्न वाढविणे असा व्यापारी दृष्टीकोन न ठेवता मंदिर हे शांतीपीठ व्हावे, असा प्रयत्न समितीने केला पाहिजे. आज मंदिर समितीने करोडो रूपयांच्या देणग्या गोळा करून कोणताही सेवा प्रकल्प की जो महाराष्ट्राला आयडॉल ठरेल, असा उभा केल्याचे अजूनही दिसून येत नाही. त्यादृष्टीने अभ्यासू व्यक्तीमत्त्व असणार्‍या व महिन्यातून एकदाच मंदिर समितीला बैठकीच्या निमित्ताने भेट देणार्‍या अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पंढरपूर शहराचा विस्तार पश्चिमेकडील भागामध्ये प्रतीदिनी होत आहे. जवळजवळ 5 कि.मी. लांब शहराचा विस्तार झालेला आहे. अनेक उपनगरे विस्तारीत आहेत. अशावेळी या उपनगरातील नागरिकांना पंढरपूरशी दैनंदिन संपर्क ठेवता यावा, याकरीता पंढरपुरात ‘शहर बस सेवे’ची अत्यंत गरज आहे. शेगावच्या गजानन महाराज मंदिराच्या धर्तीवर मंदिर समितीने अशी शहर बससेवा सुरू केली तर शहरातील हजारो लोक समितीला दुवा देतील. परंतु ही संकल्पना समितीने ना कधी बोलून दाखविली ना ती त्यांच्या अजेंड्यावर असल्याचे दिसून आले.

शहरातील सर्व प्रेक्षणिय स्थळे भाविकांना कमी खर्चात व खात्रीशीररित्या पाहता यावीत, याकरीता स्वतंत्र बससेवा चालू करून त्यासाठी काही गाईड (मार्गदर्शक) निर्माण करून ही सेवा चालू करता येऊ शकते. परंतु याचाही विचार डॉ. अतुल भोसले यांच्या आजवर झालेल्या मासीक बैठकीतून कधीही चर्चेला आला नाही. याचाही विचार केला जावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंदिर समितीमध्ये गाजत असलेला व्हीआयपी दर्शन व्यवस्थेतील काळाबाजार यावर केव्हा निर्बंध येणार आहेत? याचीही खात्रीशीर माहिती समिती अध्यक्षांनी द्यावी. यावर कोणते काय उपाय केले जाणार आहेत? हा काळाबाजार नेमके कोण करते? आत्तापर्यंत एक सदस्य याकामी समितीतून निलंबीत झाला आहे. ही घटना मंदिर समितीला फारशी भूषणावह आहे, असे डॉ. अतुल भोसलेही म्हणून शकत नाहीत. ही घटना घडली, एक सदस्य निलंबीत झाला, त्यानंतर व्हीआयपी दर्शनाचा काळाबाजार बंद झाला आहे, असे खात्रीलायकरित्या मंदिर समितीचे अध्यक्ष सांगू शकतात का? हेही त्यांनी स्पष्ट करावे. दर्शनावरून सातत्याने मतभेद निर्माण होतात. त्यातून वातावरण कुलशित होते, याबाबत कायमस्वरूपी तोडगा समिती अध्यक्ष म्हणून डॉ. भोसले काय काढणार आहेत? याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.

पंढरपूर उपविभागाचे प्रांताधिकारी हेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. ही फार जुनी पद्धत आहे. परंतु एकच व्यक्ती दोन ठिकाणी काम करत असताना त्यांच्यावर कामाचा बोजा पडतो, त्यामुळे असे अधिकारी मनात असूनही समाधानकारक काम करू शकत नाहीत. त्यामुळे अधिकार्‍यांच्या कामावरील बोजा लक्षात घेता, मंदिर समितीला स्वतंत्र कार्यकारी अधिकारी नेमणुकीबाबत डॉ. अतुल भोसले यांनी आत्तापर्यंत काय प्रयत्न केले, हेही त्यांनी जाहीर करावे. केवळ बैठकांपुरते पंढरपुरात येऊन मंदिर समितीच्या कारभारावर नियंत्रण ठेवता येणे शक्य नाही. याची जाणिव समिती अध्यक्ष म्हणून त्यांनाही असेल. आजपर्यंत तरी त्यांनी याच पद्धतीने आपला कारभार केला आहे. म्हणून डॉ. अतुल भोसले यांना असे आव्हान आहे की, त्यांनी आपल्या कराडमधील कामकाजाव्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ मंदिर समितीसाठी देऊन येथील सर्व व्यवस्था व्यवस्थितपणे कशा मार्गी लागतील, यासाठी पुरेसा वेळ देऊन प्रयत्न करणे आज गरजेचे आहे.

ज्या विश्वासाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खांद्यावर मंदिर समितीची जबाबदारी दिली आहे, त्याच विश्वासाने त्यांनी येथील कारभार केल्यास येणार्‍या लाखो भाविकांना विनासायास दर्शन मिळू शकते. मंदिराचे देऊळ करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असावेत. केवळ भल्यामोठ्या इमारती बांधून मंदिराचे उत्पन्न वाढेल, पण सोयीसुविधा उपलब्ध होतात की नाही, हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून मंदिर समितीच्या अध्यक्षांनी वारंवार पंढरपूरला येऊन तेथील कारभार पाहण्यासाठी सरप्राईज व्हीजीट देणे ही आजची गरज आहे.

मंदिर समितीचा कारभार हा लाखो रूपयांच्या देणगीवर चालू आहे. त्यामुळे आर्थिक कारभाराबाबत राज्यातील तमाम भाविकांना पारदर्शक कारभार सुरू असल्याचे प्रत्यक्ष दिसून येण्यासाठी मंदिर समिती जे ऑडिट करते, ते ऑडिट जाहीर होण्याची गरज आहे. म्हणून कार्तिकी यात्रा व आषाढी यात्रा या दोन महत्त्वाच्या यात्रेदरम्यान हे ऑडिट जाहीर झाले तर भाविकांनाही आपण देणगी स्वरूपात दिलेल्या रक्कमांचा योग्य प्रकारे विनियोग होतो आहे की नाही, हे लक्षात येईल व भाजप सरकारच्या परंपरेप्रमाणे पारदर्शक कारभार केल्याचेही भाविकांना दिसून येईल. म्हणून मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी यासाठी तातडीने पावले उचलावीत व हे ऑडिट जाहीर करावे, अशी मागणी भाजपा अध्यक्ष संजय वाईकर यांनी केली असून त्याची एक प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी असावा
पंढरपूर उपविभागाचे प्रांताधिकारी हेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात. ही फार जुनी पद्धत आहे. परंतु एकच व्यक्ती दोन ठिकाणी काम करत असताना त्यांच्यावर कामाचा बोजा पडतो, त्यामुळे असे अधिकारी मनात असूनही समाधानकारक काम करू शकत नाहीत. त्यामुळे मंदिर समितीला पूर्णवेळ स्वतंत्र अधिकारी द्यावा, अशी मागणी पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांची बुधवारी मंत्रालयात भेट घेऊन त्यांना हे निवेदन वाईकर यांनी सादर केले. यावेळी भाजपाचे शहर सरचिटणीस शंतनु दंडवते, युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष लखन ननवरे, गणेश लकेरी, गणेश गोमासे आदी उपस्थित होते.















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com