आर्थिक बळकटीसाठी सोसायट्यांनी व्यवसायाकडे वळावे..! पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन

पंढरपूर LIVE 5 मे 2018



पंढरपूर,:- गावाचा सर्वांगिण विकास व्हावा, गावात रोजगार निर्मिती व्हावी, सहकारी सोसायटीच्या आर्थिक बळकटीकरणाबरोबरच शेतकरी, सभासदांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडण्यासाठी विविध सहकारी सोसायट्यांनी गावात विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
            सहकार व पणन विभागामार्फत अटल महापणन विकास अभियानातंर्गत सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज, पंढरपूर येथे आयोजित पुणे विभागीयस्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पणन मंत्री देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, पुणे विभागाचे विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, शिवाजी पवार, गणेश शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक किसन मोटे, उपस्थित होते.
            पणन मंत्री देशमुख म्हणाले, सहकारातून गावाचा विकास होत असतो. यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे आर्थिक बळकटकरण होणे गरजेचे आहे. विकास सोसायटीनी आपल्या आर्थिक बळकटीकरणासाठी आता स्वत:च पुढे येवून अटल पणन अभियानांतर्गत गावातच नवीन व्यवसाय सुरु करावेत. यासाठी सहकार व पणन विभागामार्फत आवश्यक ती मदत केली जाईल.
            अनुदानातून नव्हे तर योगदानातून विकास सोसायट्यांचा विकास करण्यासाठी प्रत्येक सोसायटीने स्वनिधी उभारण्यात पुढाकार घ्यावा.  गावाच्या विकासात सेवा सोसायट्यांचे योगदान मोलाचे ठरणार असून त्यामुळे गावाच्या व सेवा सोसायटीच्या लौकीकात भर टाकण्यासाठी सेवा सोसायट्यांनी पुढे यावे, असे  आवाहन पणन मंत्री देशमुख यांनी केले.  सेवा सोसायट्या गावाच्या अर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आल्यास गावचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही इतकी मोठी ताकद सहकारात असल्याचेही  ते म्हणाले.  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी कार्पोरेट कंपन्यामार्फत मदत घेतली जाणार असल्याचे पणन मंत्री देशमुख यांनी सांगितले.
            श्री.देशमुख म्हणाले, सेवा सोसायट्यांनी लोकांना विश्वास संपादन करुन उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करुन व्यवसाय करण्यास पुढे आल्यास त्यांना कोणतीही समस्या येणार नाही. भविष्यात सेवा सोसायट्यांनी राज्य सहकारी बँक आणि महाराष्ट्र सहकार विकास परिषदेमार्फत कर्ज पुरवठा करण्याबाबत प्रयत्न केले जातील. तसेच सेवा सोसायट्यांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी भागीदारी तत्वावर महाराष्ट्र विकास परिषदेमार्फत कर्ज पुरवठा करता येईल काय याबाबत विचार विनिमय करुन  निर्णय घेतला जाईल असे श्री. देशमुख म्हणाले.
            अटल पणन महाअभियानांतर्गत गतवर्षी राज्यातील सुमारे 850 सेवा सोसायट्यांनी विविध व्यवसाय सुरु केले असून यातून त्यांची आर्थिक उन्नती झाली आहे व गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.  यावर्षी राज्यातील 5000 सेवा सोसायट्यामार्फत विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यशाळेस सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com