शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शवविच्छेदन विभागातील कर्मचारी प्रकाश लोंढे याला निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली.
 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नारायण चंद्रामप्पा चन्ना यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदन विभागामध्ये आणण्यात आला होता. चन्ना यांच्या नातलगांना ‘बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह देण्यात येईल,’ असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार,  (बुधवारी) सकाळी नातलग आल्यानंतर त्यांना नारायण चन्ना यांचा मृतदेह आढळला नाही. दरम्यान, चन्ना कुटुंबीय येण्यापूर्वी एक मृतदेह शवविच्छेदन विभागातून नेण्यात आला होता. यातून मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. कर्मचाऱ्यांनी चुकून शेखर यांचा मृतदेह देण्याऐवजी नारायण चन्ना यांचा मृतदेह दिवाण कुटुंबीयांना दिला. कुटुंबियांनी
मृतदेह थेट मोदी स्मशानभूमीत नेला. दोन दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याने चेहरा न पाहता पायाचे दर्शन घेऊन विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले.पण घटना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. दुपारपर्यंत कोणीच काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. चन्ना कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. सी. ब्लॉकमधील न्याय वैद्यकशास्त्र विभागात चन्ना कुटुंबीयांनी एकच गर्दी केली. (प्रतिनिधी)