'झिका'ला रोखण्यासाठी लस तयार, भारतीय शास्त्रज्ञांचा दावा

हैदराबाद : झिका या तापाने सध्या पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिकेपाठोपाठ आता हा ताप उत्तर अमेरिकेतही पोहोचला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अयशस्वी आणि हतबल झाले असतानाच हैदराबादमधील   शास्त्रज्ञांनी झिका रोखण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा केला आहे.

हैदराबदमधील शास्त्रज्ञांनी लस विकसित केल्याचा दावा

हैदराबादमधील ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेने झिका रोखण्यासाठी लस विकसित केली असल्याचा दावा केला आहे. “झिकावरील लस आम्ही तयार केली असून आमच्या माहितीनुसार जगात पहिल्यांदाच लस तयार केली आहे. शिवाय, नऊ महिन्यांपूर्वीच झिकावरील लसीचं पेटंट घेतलं आहे.”, असे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला यांनी दावा केला आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये झिका विषाणूचा उद्रेक

जागतिक आरोग्य संघटनेने झिका आणि या आजारामुळे मुलांना जन्मावेळी उदभवणाऱ्या व्यंगांमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिका खंडातील 20 पेक्षा अधिक देशांमध्ये झिका विषाणूचा उद्रेक झाला असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

झिका विषाणूंचा उत्तर अमेरिकेत शिरकाव

आधी ब्राझिलपुरतं मर्यादित असणाऱ्या झिका विषाणूंनी आता उत्तर अमेरिकेत शिरकाव केला आहे. त्यामुळे सुमारे 40 लाख अमेरिकन नागरिकांना झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूची गंभीर दखल घेत हाय अलर्ट जारी केला आहे.

भारत ‘झिका’चा मुकाबला करण्यासाठी सज्ज

डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण पाश्चिमात्य जगत चिंता व्यक्त केली जात आहे. या तापाचा भारतात शिरकाव होऊ नये, यासाठी भारत सरकारने झिका विषाणूंच्या नियंत्रणासाठी एका विशेष गटाची स्थापना केली आहे. आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी झिका विषाणूंबाबत सरकार गंभीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, या विषाणूंना भारतात शिराकव करु न देण्यासाठी विशेष गटाची स्थापना केल्याचीही जे. पी. नड्डा यांनी माहिती दिली.

झिका म्हणजे काय?

युगांडामधील वनांच्या प्रदेशावरुन झिका हे नाव आले आहे. झिका तापाचे विषाणू एडिस इजिप्ती या डासामार्फत पसरवले जातात. त्यामुळे या डास चावलेल्या व्यक्तींच्या शरीरात हे विषाणू जाऊन त्यांना ताप, डोळे येणे, सांधे दुखणे तसेच भुरळ येणे अशा तक्रारी संभवतात. झिकाचा सर्वात मोठा धोका हा गर्भवतींना आहे.
 
झिका विषाणू सर्वात प्रथम 1947 साली युगांडात आढळून आला. त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, इजिप्त, गॅबन, सिएरा लिओन, टांझानिया, युगांडा, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, थायलंड या देशांमध्ये झिका तापाचे रुग्ण आढळून आले. मात्र आता दक्षिण अमेरिकेत वेगाने प्रसारित झाल्यामुळे भीती वाढली आहे.