व्हीआयपी मार्गावर पुन्हा अपघात...! डाकबंगल्याच्या समोरच कंटेनरच्या धडकेने एमएसईबी चा पोल वाकला...! वीजेच्या तारा तुटल्या...! खुप मोठा अनर्थ टळला..!
पंढरपूर लाईव्ह:-
पंढरपूरमधील लिंकरोड वर वारंवार होणार्या अपघाताबाबतची लक्षवेधी मालिका ‘पंढरपूर लाईव्ह’ वर आम्ही सातत्याने प्रसिध्द करत आहोत. काल दि. 28 एप्रिल 2015 च्या रात्री पंढरपूर शहरातील डाकबंगल्या च्या प्रमुख गेट समोरच एका कंटेनरने रस्त्यावर असलेल्या एमएसईबीच्या विद्युत खांबाला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातामुळे विद्युत खांब वाकडा-तिकडा होऊन कंटेनरवर कोसळला. विजेच्या तारा तुटल्या. थोडक्यात मोठा अनर्थ टळला.
अपघातग्रस्त कंटेनर आज सकाळी 10:30 वाजेपर्यंत तसाच रस्त्यावर उभा होता. सदर अपघाताची कोणतीही नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नसल्याची अधिकृत माहिती मिळाली असून एमएसईबी ने नुकसान भरपाईपोटी 11 हजार रुपयेची नुकसान भरपाई पोटी कंटेनर चालकाकडून घेतलेले असून कंटेनर चालकावर दंडात्मक कारवाई करुन त्यास सोडून दिल्याची माहिती एमएसईबी चे असिस्टंट इंजिनिअर श्री. मोटे यांनी मोबाईलवरुन ‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिली. कंटेनर चालकाचे नांव राकेश थप्पा, रा.दिल्ली व कंटेनर क्रमांक एन.एल. 08 एल. 5450 असेही त्यांनी सांगितले. मात्र पंढरपूर लाईव्ह ने समक्ष घटनास्थळावर जाऊन अपघातग्रस्त कंटेनरचे जे फोटो घेतले आहेत यामध्ये संबंधीत कंटेनरचा क्रमांक एन.एल. 01 एल. 5315 असा आहे. याबाबत श्री. मोटे यांना विचारले असता, ‘‘कदाचित मागे वेगळा आणि पुढे वेगळा नंबर असेल’’ असे उत्तर त्यांनी दिले.
येथील कराड रोड ते पुणे रोड या मार्गांना जोडणारा ‘लिंक रोड’ हा व्ही.आय.पी. मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठी वळणे आहेत. भरधाव वेगाने अवजड वाहतुक येथून मोठ्या प्रमाणात होते. या मार्गावर अनेक ठिकाणी असे अपघात वारंवार घडतात. याबाबत वेळोवेळी ‘पंढरपूर लाईव्ह’ ने वृत्त प्रसिध्द केले आहे. येथील नागरिांच्या मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. हा मार्ग त्यामानाने अरुंद आहे. उपनगरांचा झालेला विस्तार पहाता या मार्गावरुन होणारी अवजड वाहतुक थांबणे अत्यावश्यक आहे. तसेच या मार्गाचे रुंदीकरण होऊन रस्ता दुभाजक व आवश्यक तेथे गतीरोधक अथवा झेब्रा क्रॉसिंग होणे आवश्यक आहे. याबाबत सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याची माहिती मिळाली. श्री.पाटील हे रजेवर आहेत तर श्री.झांबरे यांचा मोबाईल क्रमांक (9403475209) बंद आहे. याबाबत आम्ही ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यमातून संबंधीत अधिकार्यांशी याबाबत पुढील काळात निश्चितच पाठपुरावा करुन लिंक रोडवर घडणार्या अपघाताबाबतची सद्यस्थिती संबंधीत प्रशासनासमोर आग्रहाने मांडू.
********