सर्जिकल स्ट्राइकमुळे जगाला कळली भारताची ताकद : मोदी


व्हर्जिनिया, दि. 26 - बहुचर्चित अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्जिनिया येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. तसेच आपल्या संबोधनात त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Ads by ZINC
''दहशतवादाला प्रत्युत्तर देताना जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला त्यावेळी जगाला आमची ताकद काय आहे याची जाणीव झाली.  आमच्या सर्जिकल स्ट्राइकवर कोणत्याही देशाने शंका उपस्थित केली नाही'' हे सांगतानाच त्यांनी पुढे पाकिस्तानला चिमटा काढला. अर्थात ज्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक झाली केवळ त्यांनीच प्रश्न विचारले असं मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले.
'खरंतर इतर देशांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आमच्या निर्णयावर टीका केली असती, जगभरातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले असते, आम्हाला विचारणा करण्यात आली असती, पण भारताने इतकं मोठं पाऊल उचलुनही कोणीही साधी शंकाही उपस्थित केली नाही'', असं मोदी म्हणाले. दहशतवादाबाबत बोलताना पुढे ते म्हणाले,  ''आम्ही जगाला दहशतवाद समजवायचो तेव्हा कोणाला समजत नव्हतं, आज दहशतवादाने स्वतःच जगाला याबाबत समजावलंय, त्यामुळे आता संपूर्ण जगाला दहशतवाद समजला आहे''. 
याशिवाय मोदींनी तीन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागला नसल्याचं ठासून सांगितलं, तसेच गॅस सब्सिडी सोडल्यामुळे गरिबांना फायदा होत असल्याचंही ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मोदींनी विशेष कौतूक केलं. सोशल मीडियाचा खरा उपयोग स्वराज यांनी करून दाखवला. तीन वर्षात परदेशांत अडकलेल्या 80 हजार भारतीयांची स्वराज यांनी सुटका केल्याचं मोदी म्हणाले.  
अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि दहशतवादाविषयी केलेलं विधान म्हणजे दहशतवाद आणि पाकिस्तानबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासारखं असल्याचं म्हटलं जात आहे.  
यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथे जगभरातल्या 21 दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सीईओंना केले. पुढील महिन्यात भारतात जीएसटी लागू होत असून, त्यामुळे आर्थिक परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गत तीन वर्षांत भारताने सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) आकर्षित केले असल्याचे मोदी यांनी सांगितले. या बैठकीला अ‍ॅपलचे टिम कुक, गुगलचे सुंदर पिचाई आणि अमेझॉनचे जेफ बेजोस यांची उपस्थिती होती.‘मेक इन इंडिया’ मोहीम, ट्रम्प यांचे फर्स्ट अमेरिका धोरण, या आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.गेल्या तीन वर्षात भारताने सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आणली आहे, याकडेही बैठकीत मोदींनी लक्ष वेधलं. तीन वर्षांत सरकारने केलेली कामे आणि भविष्यातील योजना याबाबत मोदी यांनी माहिती दिली.
बैठकीनंतर सर्व कंपन्यांचे प्रतिनिधीही भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत, असं सुंदर पिचाई यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची होणार भेट-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान महत्वाच्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. तसेच यादरम्यान करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतासाठी 22 निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या या कराराबाबत चर्चा झाली आहे. आता या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान होणारा हा करार, जगाच्या दृष्टीने गेमचेंजर मानला जातो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्यात ड्रोन खरेदीचा करार सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. हा सौदा साधारण 130 ते 194 अरब डॉलर्सचा असणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांची चार वेळा भेट झाली होती. 
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे. एच 1 बी व्हिसाचा विषय चर्चेचा भाग नसेल, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे. दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण व त्यासाठी अमेरिकेची मदत, संबंधांना बळकटी, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. त्याची माहिती निवेदनाद्वारे सर्वांना दिली जाणार आहे. ट्रम्प व मोदी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यानंतर नेदरलँडला जाणार आहेत. नेदरलँडमध्ये डच पंतप्रधान मार्क रट व राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111