वारी विशेष लेख- वारकरी संप्रदाय बद्दल सविस्तर माहिती लेख
पंढरीची वारी जयाचिये कुळी त्याची पायधुळी लागे मजं
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी करणार्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते. वारी करणारा तो 'वारीकर' म्हणून ओळखला जातो. ही वारी अर्थातच पंढरपूर वारी होय. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत.
इतिहास
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्याघराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती.त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज,मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत वांग्मय अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूर वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय.वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे,किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे.वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."[ ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुले हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला ;परंतु संप्रदायाचा आंद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच.भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते.
या इतिहासाचे पुढील कालखंडात विभाजन करता येईल-
ज्ञानदेव पूर्व काळ-भक्त पुंडलिकाचा काळ
ज्ञानदेव-नामदेव काळ
भानुदास-एकनाथांचा काळ
तुकोबा-निळोबा यांचा काळ
तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ
प्रकार
वारीचे दोन प्रकार आहेत.
आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरात आपापल्या गावाहून येतात.
कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.
माघी व चैत्री वा-याही होतात.
माळकरी/वारकरी
आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ धारण करावी.वारकरी पंथ हा माळेच्या स्मरणी म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे सांगतो. स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा.नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा.संतांचे ग्रंथ वाचावेत.देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे.भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूर वारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.सात्विक आहार,सत्वाचरण करावे.परोपकार आणि परमार्थही करावा.जीवनातील बंधनातून ,मोहातून हळूहळू बाजूस होवून पांडुरंगाशी एकरूप व्हावे ,नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.
पालखी सोहळा
हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख.ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला सध्याचे शल्याचे वैभव प्राप्त करून देण्यात हैबतबाबा हे प्रवर्तक आहेत.
ज्ञानदेवांची पालखी - हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास सहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरु झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकार कडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
तुकोबांची पालखी-तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते.त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती.स्वत: तुकोबा चौदाशे टाळकरी घेवून प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत.तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढ ही केली.
एकोणीसाव्या शतकाच्या जवळजवळ अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव,मुक्ताबाई,जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.
आळंदी-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
आळंदी-पुणे-सासवड-लोणंद -माळशिरस-वाखरी-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक
देहू-पुणे-लोणीकाळभोर,यवत,वरवंड, बारामती,इंदापूर,अकलूज,वाखरी,पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
वारीदरम्यानचे विविध कार्यक्रम
वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वार्क्रीप्र्मुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारक-याने ज्याच्याकडून माळ घेवून वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वत:ची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात.श्री नामदेव महाराजांचा,वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होवून त्यांनी सांप्रदायिक वारी, भजन,कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत.
वारकरी महावाक्यवारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठीकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजक की जय" , "जगद्गुरु तुकाराम महाराजक की जय", "शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की जय" अशी विविधता आधलते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.
साहित्यातील चित्रण
देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दि्ग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
वारकर्यांच्या संस्था आणि संघटना
वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य
अखिल भारतीय वारकरी मंडळ
कर्नाटक वारकरी संस्था
कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
जागतिक वारकरी शिखर परिषद
तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
देहू गाथा मंदिर (संस्था)
फडकरी-दिंडीकरी संघ
राष्ट्रीय वारकरी सेना
वारकरी प्रबोधन महासमिती
वारकरी महामंडळ
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
ज्ञानेश्वर महाराज संस्थान
जन्माचें ते मूळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा ॥१॥
पापपुण्य करुनि जन्मा येतो प्राणी । नरदेहा येवूनी हानि केली ॥२॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥३॥
तम म्हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥
तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥
अहर्निश सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥
आडमार्गी कोणी जन ते जातील । त्यातुनि काढील तोचि ज्ञानी ॥२॥
तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळा त्यासी शरण जावे ॥३॥
आपण तरेल नव्हे ते नवल । कुळे उध्दरील सर्वांची तो ॥४॥
शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्हणे कुळ उध्दरीले ॥५॥
उध्दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्यात ॥१॥
त्रेलोक्यत झाले द्वेतचि निमाले । ऐसे साधियले साधन बरवें ॥२॥
बरवें साधन सुखशांती मना । क्रोध नाही जाणा तिळभरी ॥३॥
तिळभरी नाही चित्तासि तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥४॥
जैसी गंगा वाहें जैसे त्याचे मन । भगवंत जाण तया जवळी ॥१॥
त्याचे जवळी देव भक्ति भावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥
तया दिसे रुप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खुण जाणति हे ॥३॥
जाणती हे खूण स्वात्मानुभवी । तुका म्हणे म्हणे पदवी ज्याची त्याला ॥४॥
ज्याची त्याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्मसूख ॥१॥
आत्मसूख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी । याविण चावटी करु नका ॥२॥
करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी । प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
दोष हे जातील अनंत जन्मीचे । पाय त्या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्या ॥३॥
न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्द करा ॥४॥
शुध्द करा मन देहातित व्हावे । वस्तुती ओळखावें तुका म्हणे ॥५॥
ओळखारे वस्तु सांडारे कल्पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्मसुख घ्यावे वेळोवेळा ॥३॥
घ्यावे आत्मसुख स्वरुपी मिळावे । भूती लीन व्हावे तुका म्हणे ॥४॥
भूती जीन व्हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुम्ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असो हे साधन ज्यांचे चित्ती वसे । मायाजाळ नासे तुका म्हणे ॥४॥
मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्यास साक्षात्कार ॥३॥
साक्षात्कार झालिया सहज समाधि । तुका म्हणे उपाधी गेली त्याची ॥४॥
गेली त्याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाश्च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्न तो ॥४॥
निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किर्ती त्या असती । ह्र्यदगत त्याची गति न कळे कवणाला ॥६॥
न कळे कवणाला त्याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्याची ॥७॥
खुण त्याची जाणे जे तैसे असती । तुका म्हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥
दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्ती लिन झाली ॥१॥
लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥
लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्यातुनिया ॥३॥
त्या सारिखे तुम्ही जाणा साधुवृत्ती । पुन्हा न मिळती मायाजाळी ॥४॥
मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना । सत्य सत्य जाणा तुका महणे ॥५॥
स्वर्ग लोकांहूनी आले हे अभंग । धाडियले सांग तुम्हांलागी ॥१॥
नित्यनेमे यांसी पढतां प्रतापें । जळतील पापे जन्मांतरीची ॥२॥
तया मागे पुढे रक्षी नारायण । मांदिल्या निर्वाण उडी घाली ॥३॥
बुद्धिचा पालट नासेल कुमती । होईल सदभक्ति येणे पंथे ॥४॥
सदभक्ति झालिया सहज साक्षात्कार । होईल उध्दार पूर्वजांचा ॥५॥
साधतील येणे इहपरलोक । सत्य सत्य भाक माझी तुम्हां ॥६॥
परोपकारासाठी सांगीतले देवा । प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥
येणे भवव्यवथा जाईल तुमची । सख्या विठ्ठलाची आण मज ॥८॥
टाळ आणि कंथा धाडिली णिशाणी । घ्यारे ओळखोनी सज्जन हो ॥९॥
माझे दंडवत तुम्हा सर्व लोकां । देहा सहित तुका वैकुंठासी ॥१०॥
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111