‘रमझान’मध्ये संघ पदाधिका-यांची सामाजिक समरसता
नागपूर, दि. 23 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लीम समुदायाशी फारसे जुळवून घेत नाही, अशा पद्धतीचा सर्वसाधारण समज आहे. मात्र सामाजिक समरसतेचे सूत्र घेऊन देशभरात कार्य करीत असलेल्या संघाच्या मुख्यालयात ‘रमजान’च्या निमित्ताने विशेष पुढाकार घेण्यात आला. संघप्रणित मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे याला संघ परिवारातील काही पदाधिकाºयांची यावेळी उपस्थिती होती.
मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे गेल्या काही काळापासून ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक भागात संघाचे पदाधिकारीदेखील यात सहभागी होताना दिसून आले. यंदा नागपुरात गुरुवारी मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे मोमीनपुरा येथील जामा मस्जिदजवळ ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. यात ६०० हून अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. यावेळी संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, आ.सुधाकर देशमुख, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर प्रामुख्याने सहभागी होते. यावेळी महानगर संघचालकांनी उपस्थित मुस्लीम नागरिकांशी संवाददेखील साधला.
देशात शांती, बंधुभाव नांदणे आवश्यक आहे. आपला देश या गोष्टींचे नेहमी संदेश देत आला आहे. त्यामुळे ईद असो किंवा दिवाळी, प्रत्येक सणातून एकतेचा संदेश गेला पाहिजे. देशाला भ्रष्टाचार, दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी सर्व धर्म-पंथाच्या नागरिकांनी एकत्र आले पाहिजे. विशेष करून लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, असे आवाहन यावेळी राजेश लोया यांनी केले.
यावेळी मुस्लीम राष्ट्रीय मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद फारुख शेख, महाराष्ट्र युवा अध्यक्ष दिवान शादअली, महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक अन्सार अली, नागपूर शहर संयोजक रियाज खान, हाजी इकबाल शेख, इरशाद हुसैन, असलम खान, श्याम देशमुख, अभय खोंड, कार्यक्रमाचे सहसंयोजक मोहम्मद इरफान अन्सारी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘बीफ’ विरोधात गायीच्या दुधाचे वाटप-
मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे देशभरात ‘इफ्तार’चे आयोजन करण्यात येत असून यात ‘बीफ’ कसे धोकादायक आहे याबाबत भुमिका मांडली जात आहे. ‘इफ्तार’च्या दरम्यान गायीच्या दुधाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
