महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
नवी दिल्ली, 21 : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज तिसरा अंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याची लगबग होती. तशीच ती महाराष्ट्र सदनातही बघायला मिळाली. निमित्त होते, महाराष्ट्र सदनात आयोजित तिस-या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे.
कोपर्निक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी योग दिनाचे आयोजन करण्यात आले. ऐस-पैस जागेवर अंथरण्यात आलेली कार्पेट आणि टापटीप पोशाखांसह अधिकारी- कर्मचारी योगासनाच्या वेशात दिसत होते. पहिल्या रांगेत निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त इशू संधू आणि त्यानंतर अगदी शिस्तीत व रांगेत बसलेले महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंचावर मोरारजी देसाई राष्ट्रीय योगासन संस्थेचे योगा थेरपिस्ट आनंद वर्धन आणि संस्थेचे विद्यार्थी अन्शुल राठी यांनी महत्त्वपूर्ण योगासनांची माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखवली . योगसानाचे महत्त्व पटवून देताना आनंद वर्धन यांनी यावेळी विविध योगासनांचे फायदेही समजाऊन सांगितले.
जवळपास एक तास भर चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ संमगच्छध्वं ....’ या प्रार्थनेने झाली. यानंतर क्रियांचा अभ्यास करून घेण्यात आला. यात, मुख्यत्वे सुक्ष्म क्रिया,ग्रीवा चालन, कटी चालन, घुटना संचलन आदींचा समावेश होता. क्रिये नंतर योगासने झाली. यात ताडासन,वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन ही उभी आसने; तर बसून करावयाच्या योगासनांमध्ये भद्रासन, वज्रासन, उस्ट्रासन, शशांकासन,उत्तान मंडुकासन आणि वक्रासन ही आसने झाली. पोटाच्या व पाठीच्या सहाय्याने झोपून यावेळी मक्रासन, भुजंगासन, सुलभासन,सेतूबंधासन, उत्तान पादासन, अर्धहलासन, शवासन ही आसने झाली. कार्यक्रमाच्या समारोपात प्राणायम आणि ध्यान मुद्रा झाल्या. नाडीशोधन, कपालभाती, शितली प्राणायम आणि भ्रामरी प्राणायम तसेच शांभयुमुद्रेत ध्यानाची क्रियाही उपस्थितांनी केली. ‘सर्वेत्र सुखीन संतू ....’ अर्थात जगात सर्वत्र आरोग्य व शांतता नांदू दे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



