शेलगावात सहा घरे फोडली; 5 लाखांच्या ऐवजाची चोरी


बार्शी : तालुका प्रतिनिधी 
पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍यांची मालिका सुरूच असून शनिवारी पहाटे शेलगाव (व्हळे, ता. बार्शी) येथील भरवस्तीमधील 6 घरे एकाच रात्रीत फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 
आगळगावातील चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत चोरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ  घातल्यामुळे पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सामान्य जनता भयभीत झाली आहे. चोरीच्या तपासासाठी सोलापूर येथून श्‍वानपथक मागवण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा शोध घेण्यास श्‍वानपथक अपयशी ठरले.
महेश अनंतराव व्हळे (वय 28, रा. शेलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास जेवणखान उरकून ते घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते.दरम्यान, पहाटे अनंतराव व्हळे यांनी फिर्यादीस फोन करून तू घराचा दरवाजा बाहेरून बंद का केलास, असे म्हणून उघडण्यास सांगितले. महेश खाली आल्यावर व घराचे इतर दरवाजे उघडे असल्याचे दिसून आल्यावर कपाट व इतर वस्तू अस्ताव्यस्त दिसल्या. त्यांनी सगळीकडे पाहणी केल्यावर घरात चोरी झाल्याची खात्री झाली. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख 72 हजार रुपये रोख, 70 हजार रुपये किंमतीची एक पिळ्याची सोन्याची अंगठी, अर्धा तोळा वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 1200 रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण व जोडवे असा अडीच तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
त्यानंतर चोरट्यांनी गावातीलच यशवंत सुखदेव व्हळे यांच्या घराकडे मोर्चा वळवून अडीच तोळ्याचे सोन्याचे तीन गंठण, अर्धा तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याची एक अंगठी व रोख पन्नास हजार रुपये अशा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. नंतर चोरट्यांनी गावातीलच किसन अंबऋषी शिंदे यांच्या घरावर लक्ष केंद्रीत करून घरात ठेवलेले रोख पाच हजार रुपये रोकड व न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याची कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली.
त्यानंतर चोरट्यांनी येथीलच सुग्रीव विश्‍वनाथ व्हळे यांचे बंद असलेले घर फोडून आत प्रवेश करून घरात ठेवलेले रोख दहा हजार रूपये व अर्धा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला.
गावातीलच भारत सौदागर कणसे यांच्या घरात प्रवेश करून 20 हजार रुपये रोख रक्कम व सात ग्रँम वजनाचे सोन्याची बोरमाळ आदी साहित्यांवर हात साफ केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
रामहरी व्हळे हे पुणे येथे कामानिमित्त गेले असता यांच्याही  बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून साहित्य अस्ताव्यस्त फेकले असून त्यांची नेमकी चोरी किती झाली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शेलगाव येथे एकाच रात्रीत वेगवेगळ्या भागात चोर्‍या झाल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. सहा घरे फोडल्यामुळे पांगरी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. पांगरी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत. 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111