महानंद’च्या अठरा संचालकांविरुद्ध गुन्हा


  • मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बरखास्त केलेल्या तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त सल्लागारांविरुद्ध गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
    महाराष्ट्र राज्य दूध वितरक आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००० ते २००५मध्ये महानंद दूध डेअरी महासंघाने कोट्यवधींचा घोटाळा केला. माहितीच्या अधिकारातून ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यात उस्मानाबादच्या भूम तालुका दूध संघाला एप्रिल २००९मध्ये नियमांचे उल्लंघन करून ६५ लाख रुपये अग्रीम रक्कम देण्यात आली होती. महानंदच्या संचालक मंडळाने विशेष अग्रीम वाटपाबाबत निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक धोरणाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून ही जास्तीची रक्कम दिली. त्या वेळी भूम तालुका दूध संघाचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे आ. राहुल मोटे हे महासंघावर संचालक होते. पालिका अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. श्रीनिवासन व्यवस्थापकीय संचालक होते. सध्या महावितरणामध्ये असलेले नंदलाल विसपुते आणि वाव्हळ हे तेव्हा वित्त सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देण्यात
    आलेली रक्कम ३१ मार्च २०११पासून
    थकीत आहे. या रकमेच्या बदल्यात भूम दूध संघाने महानंदला दुधाचा पुरवठा केला नसल्याचे नाईक यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 
    विनायक पाटील, शिवराम जाधव, राजसिंह मोहिते-पाटील, पुंडलिक काजे, शांताराम तुळसीदास देशमुख, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, नीलकंठ कोढे, श्रीधर ठाकरे, दीपक पाटील, रामराव वडकुते, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील फुंडे, रंजना पडोळे, कौशल्या पवार, गीता चौधरी, हिंमतराव पवार या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी दिली.