'फिल्मफेअर'मध्ये दीपिकानं वाचलं वडिलांचं पत्र
मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड २०१६ नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार बाजीराव-मस्तानीसाठी रणबीर कपूरला तर सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार 'पिकू'साठी दीपिका पादूकोणला देण्यात आला... दीपिकानं हा पुरस्कार जिंकलाच शिवाय यावेळी तीनं एक भावूक पत्र वाचून सगळ्यांची हृदयही जिंकली.
या पुरस्कार सोहळ्यात अनेक विजेत्यांनी आपली सिने टीम, दिग्दर्शक, प्रोड्युसर यांचे आभार मानले. पण, दीपिकानं मात्र यावेळी आपल्या वडिलांनी - प्रकाश पादूकोण यांनी आपल्याला लिहिलेलं एक पत्र वाचून दाखवलं.
तू जे काही करतेय ते खरचं तुला आवडत असेल तर त्याशिवाय दुसरं काहीही महत्त्वाचं नाही.... अगदी अवॉर्डही नाही. तुझं मन काय सांगतंय पाहा आणि तुझी स्वप्न प्रत्यक्षात आण... तू पहिल्यांदा आमची मुलगी आहेस आणि नंतर एक अभिनेत्री' असं या पत्रात प्रकाश पादूकोण यांनी आपल्या मुलीसाठी म्हटलं होतं.
दीपिकानं हे पत्र वाचून दाखवल्यानंतर सगळं वातावरण भारावलं होतं.